मागील विधानसभा, लोकसभा निवडणूकीत युवकांची भूमिका महत्वाची
शहर उपाध्यक्षपदी दीपक मोढवे यांची निवड करून युवावर्ग खेचण्याचा प्रयत्न
पिंपरी-चिंचवड : बापू जगदाळे
गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत युवावर्गाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचा फायदा भाजपाला झाला. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या चेहर्यांना संधी देण्याचे धोरण पक्षाकडून राबविले जात आहे. नुकतीच पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्षपदी दीपक मोढवे यांची निवड करून भाजपाने तरुणवर्ग आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा
मोढवेंना शोधले मनसेतून
कामाचे व्यवस्थापन आणि योग्य नियोजन या जोरावरच गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये भाजपाने सत्ता काबिज केली. दीपक मोढवे हे एक व्यावसायिक आहेत. मॅनेजमेंट किंग म्हणून त्यांची ओळख आहे. अतिशय खडतर प्रवासातून त्यांनी आपला व्यवसाय देशभर पोहोचविला आहे. तसेच मनसे वाहतूक सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष, मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य सचिव, मनसे वाहतूक सेनेचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष याशिवाय इतर अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. सध्या पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सल्लागार म्हणून ते काम पहात आहेत. तसेच विविध राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जवळचेे संबंध आहेत. त्यांच्या या वलयाचा फायदा भाजपाला होऊ शकतो.
आगामी निवडणूक महत्वाची
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भाजपाला पराभूत करण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपाकडूनही सावध पावले उचलली जात असल्याचे पहायला मिळत आहे. तरुणवर्ग हा या निवडणुकीमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो, ही शक्यता गृहीत धरून भाजपाकडून आता तरुणांना संधी दिली जात आहे. गाव ते शहर पातळीवर पक्षाच्या विविध पदांवर तरुण कार्यकर्ते कार्यरत असल्याचे पहायला मिळत आहे. दीपक मोढवे हे उच्चशिक्षित आहेत. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मोढवे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आता युवापिढीचा प्रतिनिधी म्हणून मोढवे आगामी निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.