भाजपासोबत सत्तेत राहण्यावर सेनेचे शिक्कामोर्तब!

0
शिवसेना-भाजप वादावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाकला पडदा
मुंबई-शिवसेना-भाजपाचे ‘मधुर’ संबंध सत्ता स्थापनेपासून सर्वश्रुत आहेत. वारंवार सत्तेत सहभागी असून देखील भाजपवर जोरदार टीका करत सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्या देणाऱ्या शिवसेनकडून अखेर सत्तेतच राहणार असल्यावर शिक्कामोर्तब केले गेले आहे. भाजपबरोबरील सत्तेतून आम्ही बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून राज्यातील जनतेच्या हिताची कामे करू अशी स्पष्टोक्ती दस्तुरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी दिली. शिवसेनेच्या पदाधिकारी आणि आमदार खासदारांची वांद्रे येथील रंग शारदा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील खुलासा केला. मागे झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात आगामी काळातील कोणतीही निवडणूक भाजपबरोबर युती करून लढविणार नसल्याची घोषणा करत सर्व निवडणूका एकट्यानेच लढविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
 त्यानंतर भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र शिवसेनेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी युती होईल याचा विचार न करता पक्ष कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले. नेमक्या याच कालावधीत शिवसेनेकडूनही सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत भाजपला देत दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भेटीगाठींवर भर दिला. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण अस्थिर झाल्याचे चित्र निर्माण झाले. तसेच मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या आमदार-खासदरांनीही राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याबाबतची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे वेळोवेळी केली. परंतु, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकांना एकवर्षाचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच भाजबरोबरील सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार नसल्याचे उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट करत शिवसेनेबाबतच्या व्यक्त करण्यात येत असलेल्या शक्यता मोडीत काढल्या.
महामंडळाची यादी दीड दोन वर्षांपूर्वीची
ठाकरे यावेळी म्हणाले की अतिरेकी आणि पाकिस्तान मध्ये जा बोलण्यापेक्षा देशातील तरुणांशी संवाद करून प्रश्न सोडवा.  शहरी नक्षलवाद आणि सनातन याबद्दल नुसते आरोप करू नका खरे असल्याचे पुरावे सादर करा.हिंदू दहशतवाद या सरकारच्या काळात बोलले जात असेल तर ते दुर्देव आहे, असेही ते म्हणाले. नोटबंदी फसली याची जवाबदारी कोण घेणार. मृत्यूच्या शय्येवर रुपया आहे याची सरकार जवाबदारी घेणार का. गरज पडली तर पुन्हा नोटबंदी लावू हे RBI पुन्हा सांगत आहे हे जनता सहन करणार नाही असेही ते म्हणाले. महामंडळाची यादी दीड दोन वर्षांपूर्वीची आहे.आम्हाला कुठली ही अपेक्षा नाही.सत्तेत  राहून आम्ही विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रश्न सोडवत आहोत, असा दावा ठाकरे यांनी केला.