वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे ; पदाधिकार्यांकडून गटा-तटाचे राजकारण
वरणगाव- औरंगाबाद खंडपीठाने मीच गटनेता असल्याचे शिक्कामोर्तब केले असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार संजय सावकारे यांच्याशी चर्चा करूनच आपण नगराध्यक्ष पदाचा फार्म भरला मात्र आपल्यावर बंडखोरीचा ठपका ठेवण्यात आला मात्र आपण पक्षाचे एकनिष्ठ असून भाजपा नगरसेविका माला मेढे व नसरीन बी.कुरेशी यांनी गटनेत्यांचे आदेश पाळून पक्षनिष्ठा जोपासली आहे मात्र गटातटाचे राजकारण करणार्या भाजपा तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे व भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी आता राजीनामे देण्याची वेळ असल्याचे मत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार व्यक्त केले.
पार्टीशी बेईमानी करणार्यांना फळ मिळणार
नगराध्यक्ष काळे म्हणाले की, भाजपाच्या पाच नगरसेवकांनी पार्टीचा व्हीप झुगारल्याने त्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेचा प्रस्ताव आपण पूर्वीच दाखल केला आहे शिवाय त्यावर उच्च न्यायालयाने आपण भाजपा गटनेता असल्याचे शिक्कामोर्तब करीत पुढील कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिल्याने पक्षाशी बेमानी करणार्यांना अपेक्षित निकाल भेटणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. पदाधिकार्यांनी मला व माझ्या नगरसेवकांना सव्वा वर्ष्यात एकाही पक्षाच्या कार्यक्रमांना व पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण दिले नाही उलट पार्टीच्या बूथ रचनेतून काढून टाकले व मला थेट पक्षातून काढण्याच्या हालचाली सुद्धा केल्याचा आरोप ाकळे यांनी केला. पदाधिकार्यांच्या राजीनाम्याबाबत जिल्हाध्यक्षांकडे मागणी करणार असून पक्षश्रेष्ठींच्या कानावरही हा विषय आपण घालणार असून आपणास बंडखोर ठरवणार्यांविरुद्ध अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्ल्याचे ते म्हणाले.
आम्हीच पक्षाचे एकनिष्ठ -सुधाकर जावळे
आम्ही पक्षाचे एकनिष्ठ असून पक्षाने सोपवलेली जवाबदारी नेटाने पार पाडत आहोत. सुनील काळे यांच्या आरोपात तथ्य नाही, त्यांनी वाट्टेल तेथे जावे, त्यांना सर्व मार्ग मोकळे आहेत. त्यांना आमचा राजीनामा मागण्याचा नैतीक अधिकार नाही, असे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे म्हणाले.
नैतीकता, निष्ठा कुणीही शिकवू नये -प्रा.सुनील नेवे
गेल्या 20 वर्षांपासून भाजपाचे निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करीत असून संघटना जोडण्याचे काम करीत आहे. सुनील काळे यांनी केलेल्या आरोपामुळे मन दुःखी झाले असून अशी अपेक्षा नव्हती. नैतीकता व निष्ठा आपल्याला कुणीही शिकवू नये. पक्षाने आदेश दिला तर एका सेकंदात सर्व पदे सोडून कार्यकर्ता म्हणून काम करायला तयार आहे, असे भाजपाचे संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे म्हणाले.