कोणत्याही सरकारला मिडीयाचा आवाज दाबता येणार नाही : समीरण वाळवेकर
सरकारने पत्रकारांची अवस्था शेतकर्यांसारखी केली : एस.एम.देशमुख
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हास्तरीय अधिवेशनाचा शानदार समारोप
अंबाजोगाई : पत्रकार संरक्षण कायदा करण्याविषयी सरकार टाळाटाळ करीत आहे. सरकारची भूमिका व निती बदलल्याचे दिसत आहे.मुळात सरकारला हा कायदाच नको असल्याने तो प्रलंबित ठेवला आहे. मिडीयाची मदत घेवून सरकार सत्तेवर आले.पण,या सरकारला आज मिडीयाचाच विसर पडला असून मिडीयावर बंधने आणली जात आहेत. तसेच राज्यातील वाढती महागाई,पेट्रोल दरवाढ या बाबत विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थतीकडे अधिवेशनात लक्ष वेधले.तर यावेळी बोलताना ज्येष्ठ माध्यमतज्ञ समीरण वाळवेकर यांनी सध्या तीन दशकानंतर मिडीयाची अवस्था वाईट झाल्याचे सांगुन मिडीया ही व्यवस्थाच संपावयाची आहे.गोबेल्सचे तंत्र वापरून सरकार निरंकुश राज्य राबवित आहे.तेंव्हा आशा काळात धोक्याची घंटा ओळखून माध्यमात काम करणार्या प्रत्येकाने डोळस पत्रकारिता करून सरकारचा सक्षमपणे विरोध केला पाहिजे. असे आवाहन वाळवेकर यांनी केले तर मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी सरकारच्या प्रसार माध्यमाविषयीच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करून पुढील काळात संघटीत होवून लढा देण्याचे आवाहन केले.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने गुरूवार,दि. 20 सप्टेंबर रोजी येथील एम.आय.टी.संचलीत श्री.सरस्वती पब्लिक स्कुल नागझरी (शेपवाडी) येथे पहिल्या बीड जिल्हास्तरीय अधिवेशन व पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी जेष्ठ माध्यमतज्ञ समीरन वाळवेकर, माहिती संचालक यशवंत भंडारे मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त, एस.एम देशमुख यांच्यासह आ.संगीताताई ठोंबरे,माजी मंञी प्रकाशदादा सोळंके, शरद पाबळे, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, स्वागताध्यक्ष राजकिशोर मोदी, एम.आय.टीचे समन्वयक राजेश कराड ,चेअरमन रमेशराव आडसकर,पृथ्वीराज साठे,नंदकिशोर मुंदडा,बजरंग सोनवणे यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी “स्व.सुंदरराव सोळंके स्मृती पत्रकारिता सेवा गौरव पुरस्कार” मुंबई येथील पी.टी.आयचे निवासी संपादक विलास तोकले यांना,“स्व.बाबुरावजी आडसकर स्मरणार्थ पत्रकारिता पुरस्कार” सर्वोत्तम गावरस्कर यांना “स्व.प्रभाकरराव कुलकर्णी स्मरणार्थ श्रमिक पत्रकारिता पुरस्कार” उपसंपादक दगडू पुरी यांना तर मराठी पत्रकार परिषद बीडच्या वतीने देण्यात येणारा स्व.भास्कर चोपडे समरणार्थ युवा पत्रकारिता पुरस्कार उपसंपादक रवी उबाळे यांना देवून सन्मानित करण्यात आले.पुढील वर्षीपासून दिवंगत माजी मंत्री विमलताई मुंदडा यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्याचे संयोजकांनी जाहीर केले.
उद्घाटक म्हणून बोलताना ना.धनंजय मुंडे यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले.अतिशय चांगले अधिवेशन घेतल्याबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे कौतुक केले. माध्यमांविषयी सरकार उदासिन असल्याचे सांगुन चॅनलवरील चर्चासत्रात आपल्याला पाहिजे त्या विषयावर चर्चा होत नसेल तर जाहिराती बंद करू असा दबाव चॅनलवर असल्याचे त्यांनी सांगितले.2019 ला देशात कदाचित शेवटची निवडणूक होईल व त्यानंतर देशाची घटना बदलली जाईल.अशी भिती व्यक्त करून जे सरकार जनतेच्या विरोधात त्यांच्या विरोधात आम्ही असे सांगुन बीड जिल्ह्यातील पत्रकारीतेला असणारा मोठा वारसा या विषयाची माहिती मुंडे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणातून दिली.परिवर्तनाच्या लढाईत प्रसार माध्यमांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सत्काराला उत्तर देताना विलास तोकले यांनी तरूण पिढीतील संवाद आधुनिक तंत्रज्ञानामुळे कमी होत असल्याचे सांगुन नाकारात्मक पत्रकारितेला मिळत असलेल्या प्राधान्याबद्दल नापसंती व्यक्त करून एकेकाळी मिशन असणारी पत्रकारिता आज कमिशनपुर्ती समित झाल्याचे त्यांनी नमुद केले.
यावेळी माध्यमतज्ञ समीरण वाळवेकर बोलताना म्हणाले की, स्पष्ट भूमिका घेणारे व टिका करणारे पत्रकार सरकारला नको आहेत. भांडवलदारांच्या हातात मिडीया जात आहे. आपल्याला हवे तेच लोकांना दाखवा असे धोरण सरकारचे असून पुढील काही दिवसात ग्रामिण भागातील 35 टक्के वर्तमानपत्रे बंद पडतील अशी भिती व्यक्त करून भूमिका घेवून पत्रकारीता करा, आव्हाने ओळखा, डोळस व्हा,तंत्रज्ञानाशी दोस्ती करा असे आवाहन वाळवेकर यांनी केले.
अध्यक्षीय समारोप करताना एस.एम. देशमुख यांनी पाठपुरावा करूनही पत्रकार कायदा विधेयक राष्ट्रपतींकडे प्रलंबित असल्याचे सांगितले. वय वर्षे 60 पुर्ण झालेल्या व 30 वर्ष अनुभव असलेल्या पत्रकारांना पेन्शन मिळावी, अधिस्वीकृतीच्या नियमावलीत शितीलता आणावी.पत्रकारांना आरोग्य विषयक सोयी सुविधा,मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजुरीसाठी मराठी पत्रकार परिषदेने घेतलेल्या भूमिकेला सहकार्य करण्याचे काम विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल्याचे देशमुख म्हणाले. जिल्हा पातळीवरचे उत्कृष्ठ अधिवेशन अंबाजोगाईत घेतल्याबद्दल त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई येथील संयोजन समितीचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय आंबेकर यांनी केले.यावेळी आ.संगीताताई ठोंबरे,स्वागताध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.पृथ्वीराज साठे,राजेसाहेब देशमुख,यशवंत भंडारे, रमेशराव आडसकर, नंदकिशोर मुंदडा, अनिल महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रारंभी पत्रकार वसंतराव मुंडे यांच्या मातोश्री व पत्रकार संजय रानभरे यांच्या मातोश्री यांच्या दु:खद निधनाबद्दल सभागृहाने श्रध्दांजली अर्पण केली.या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील जेष्ठ संपादक सर्व दैनिकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्याने उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मान्यवरांची पत्रकार कल्याण निधीस सढळ हस्ते मदत
माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके यांनी स्व.सुंदरराव सोळंके माजलगाव सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकार कल्याण निधीसाठी पाच लाख एक हजार रूपये देत असल्याचे तर बीड जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती राजेसाहेब देशमुख यांनी 51 हजार रूपये देण्याचे जाहिर केले.ज्येष्ठ संपादक सर्वोत्तम गावरस्कर यांनी पुरस्काराची 21 हजार रूपये रक्कम व विलास तोकले यांनी पुरस्काराचे 21 हजार व स्वतःचे पाच हजार असे मिळवून 26 हजार रूपये पत्रकार कल्याण निधीसाठी दिले.