भुसावळ । जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे वातावरण तापायला सुरुवात झालेली असून आमदार संजय सावकारे समर्थकांमध्ये वाद निर्माण झाले असून सभापती राजेंद्र चौधरी यांनी पंचायत समिती सभापती दालनातून काढलेली आमदार सावकारेंची प्रतिमा उपसभापतींनी पुन्हा बसविल्याने आपसातच प्रतिमा वार सुरु झाल्याचे दिसून येत आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीत कुर्हे पानाचे गणातून भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या सभापती राजेंद्र चौधरी यांनी आक्रमक भूमिका घेऊन पंचायत समितीच्या सभापती दालनात स्वखर्चाने लावलेली आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा काढून त्यांनी रोष व्यक्त केला होता. मात्र दोनच दिवसात उपसभापती मुरलीधर पाटील यांनी पुन्हा प्रतिमा बसविली.
उमेदवारी नाकारल्याने चौधरींची नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडून आलेले पंचायत समितीचे सभापती राजेंद्र चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार संजय सावकारेंचे नेतृत्व स्विकारुन त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केला होता. पंचायत समितीमध्ये सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य निवडून आले असताना देखील राजेंद्र चौधरी यांना सभापतीपद मिळविण्यासाठी कसरत करावी लागली होती. शेवटी वर्षभरासाठी त्यांना सभापतिपदाची संधी मिळाली. मात्र, नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत त्यांचा हतनूर गण आरक्षित झाल्याने त्यांनी यंदाच्या निवडणुकीत कुर्हे पानाचे गणातून उमेदवारी मागितली होती.
यांनी लावली प्रतिमा
बाहेरच्या मुद्द्यावरून त्यांची उमेदवारी ऐनवेळी कापण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी सभापती दालनातील आमदारांची प्रतिमा दोन दिवसांपूर्वी काढून टाकली. पंचायत समिती सभागृहात उपसभापती मुरलीधर पाटील, माजी सभापती मंगला झोपे, सदस्या मनिषा पाटील, ज्ञानदेव झोपे यांनी पुन्हा सभापतींच्या सभागृहात जावून आमदार संजय सावकारेंची प्रतिमा लावण्यात आली. या प्रतिमेच्या ठिकाणी अगोदरच पंचायत समिती सभापती राजेंद्र चौधरी यांनी सावकारेंची प्रतिमा काढून पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांची प्रतिमा लावली होती. याप्रसंगी किन्ही ग्रामपंचायत सदस्य प्रदिप कोळी, तळवेलचे कांता पाटील, सोपान पाटील, अशोक पाटील, अर्जुन इंगळे, मंगेश पाटील, अमोल महाजन, भालचंद पाटील, दलु भोळे आदी उपस्थित होते.
पंचायत समिती सभागृहातील आमदार संजय सावकारे यांची प्रतिमा काढून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा लावली होती. मात्र या प्रतिमे शेजारीच उपसभापतींनी आमदारांची प्रतिमा लावल्याने यातून त्यांच्याच बुध्दीची किव करावीशी वाटते. – राजेंद्र चौधरी, सभापती
आचारसंहिता सुरु असल्यामुळे पंचायत समिती सभागृहात आमदारांची प्रतिमा लावणे हे आचार संहितेचे उल्लंघन ठरते. त्यामुळे गटविकास अधिकार्यांशी चर्चा करुन पुढील कारवाई करणार. परंतु गटविकास अधिकार्यांचा दुरध्वनी बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही.
– श्रीकुमार चिंचचकर, प्रांताधिकार तथा निवडणूक निर्णय अधिकारी