पुणे । भारत देशात भाजप आणि कम्युनिस्ट हे पक्ष सोडले तर देशातील इतर सर्वच पक्षात घराणेशाही आहे. भारतीय जनता पक्षातील सर्व कारभार हा 100 टक्के लोकशाही पद्धतीने चालतो. अगदी शेवटचा कार्यकरताही पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो तर चहा विकणाराही देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. इतर पक्षात असे होताना दिसत नाही. काँग्रेसचा अध्यक्ष कोण होईल, असे विचारले तर एखादा लहान मुलगाही याचे उत्तर सांगेल. या देशात भाजप आणि कम्युनिस्ट सोडले तर सर्वच पक्षात घराणेशाही असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
गुजरातीत शिवाजी महाराजांचा इतिहासात अमित शहा यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाची पुस्तके माझ्याकडून घेतली असून मागील नऊ महिन्यापासून त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास गुजराती भाषेत लिहायचा आहे. शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास सर्वश्रुत आहे. या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांचा इतर इतिहास गुजराती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस असल्याचे विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी? या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मोदींना देशाच्या पुढील पीढीची चिंता आहे. तर सोनिया गांधींना आपल्या मुलांची चिंता आहे. जेव्हा व्यक्तीच्या आधारे निवडणुका लढविल्या जातात तेव्हा देशहीत पाहिले जात नाही. या अगोदरच्या नेत्यांना स्वहीत पाहिले आणि भ्रष्टाचाराचा रेकॉर्ड मोडला. भाजप सत्तेत येऊन 3 वर्षे झाली असून पक्षाच्या करणी आणि कथणी मध्ये कसलेच अंतर नाही. तीन वर्षांत मोदींनी अंत्योदयाचा विचार करूण कार्य केले. सर्वसामान्यांसाठी उज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, शौचालय योजना यशस्वीपणे राबविल्या. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात लढाई केली. गोरगरीबांसाठी राबविलेल्या योजनांमधून रोजगाराला चालना दिली. या योजनांमुळे देशाच्या जीडीपीमध्ये देखील वाढ झाली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. मोदींनी देशात जीएसटी लागू करून चमत्कार घडवला. पूर्वी महाराष्ट्रात 40 हजार लोक व्हॅट भरत होते. आता जीएसटी लागू केल्या पासून महाराष्ट्रात आतापर्यंत 2.50 लाख लोकांनी जीएसटी रजिस्ट्रेशन केले आहे. परिणामी महाराष्ट्राला पुढील वर्षी 10 ते 15 कोटी कर जास्त मिळणार आहे. आतापर्यंत 6 कोटी लोक ईन्कम टॅक्स भरू लागले आहेत. मोदींनी खर्या अर्थाने काळ्या पैशावर टाच आणली. पूर्वीचे सरकार भीतीपोटी कायदा आमलात आणत नव्हते. मात्र, मोदींनी कायदा लागू केला त्यामुळे मोठ्या कंपन्या कर्ज बुडवू शकणार नाहीत. कर्ज बुडविल्यास त्यांची संपत्ती जप्त करून कर्ज वसूली करण्याचा कायदा केला. देशाच्या संरक्षणासाठी लागणारी राजकीय ताकत मोंदींनी दाखवून दिली.
स्वातंत्र्य चळवळीच्या सहानुभूतीमुळे काँग्रेस आणि नेहरू सरकारला फायदा झाला. नेहरूंचा विचार हाच देशाचा विचार, नेहरूंची निती हीच देशाची निती असे काँग्रेसच्या काळात होते. देशात पुंजीवाद आणि साम्यवाद दोनच विचारसरणी होत्या. यावेळी पं. दिनदयाळ उपाध्याय यांनी देशासाठी एकात्म मानवदर्शन असणारा विचार दिला. आज भाजप त्याच विचाराने काम करत आहे. आज देशात सायनो कॅपेटीलिझम अर्थात चीनी पुंजीवाद उदयास आला आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाने एकात्म मानवदर्शन विचाराने देशाला अंत्योदयापर्यंत घेवून जाण्याचा संकल्प केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठी, हिंदी व इंग्रजी आवृत्ती
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लिहिलेल्या आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने प्रकाशित केलेल्या भारतीय जनता पार्टी राजकारणात कशासाठी? या पुस्तकाच्या मराठी, हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजप नेत्यांची उपस्थिती
यावेळी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते.