ठाणे । भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी ठाण्यातील भाजपचे ज्येष्ठ, निष्ठावंत व अभ्यासू कार्यकर्ते शैलेश बद्रीप्रसाद शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व भाजप कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय केनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गोरक्ष धोत्रे व प्रमुख सल्लागार शिवाजी आव्हाड यांनी मुंबईत झालेल्या एका समारंभात शैलेश शर्मा यांना उपाध्यक्ष पदाचे नियुक्तिपत्र प्रदान केले.
शैलेश शर्मा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात सन 1990मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा पासून केली. युवा मोर्चात त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना भाजप ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून बढती देण्यात आली. त्यानंतर शहर जिल्हा प्रसिध्दीप्रमुख, उपाध्यक्ष अशी पदे भूषविली. 1995 पासून झालेल्या सर्व भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्षांच्या कारकिर्दीत त्यांच्यावर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली होती. एक ज्येष्ठ, अभ्यासू व निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या शैलेश शर्मा यांची प्रशासकीय कामकाजावर मजबूत पकड आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांना ठाणे महानगरपालिका परिवहन समितीवर पाठवले. परिवहन सदस्य म्हणूनही त्यांनी चार वर्षे काम केले. या कालावधीत त्यांनी ठामपा परिवहन सेवेतील अनेक समस्यांना वाचा फोडून कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
पक्षाच्या कार्यात हिरिरीने भाग
गेल्या 27 वर्षांत पक्षाच्या प्रत्येक कार्यात, आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला आहे. प्रत्येक निवडणूकीत उमेदवाराच्या विजयासाठी पक्षाच्या व्यूहरचनेत त्यांचा सहभाग असायचा. पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिक आणि अभ्यासूवृत्तीने तडीस नेणे ही शर्मा यांची खासीयत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या आदेशानुसार त्यांची भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. भाजप चित्रपट कामगार आघाडीचे ध्येय, धोरणे, कामगार, कलाकारांच्या समस्या व संघटनेने दिलेले कार्यक्रम कामगार-कलाकारांच्या विकासासाठी राबवून देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये चित्रपटातील कामगारवर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी मी यशस्वी व प्रामाणिकपणे पार पाडीन, अशी प्रतिक्रिया शैलेश शर्मा यांनी बोलताना व्यक्त केली.