भाजप नगरसेवकाचा विरोध मोडून ‘एम्पायर इस्टेट’ रॅम्प उभारणारच

0

उड्डाणपूलावर चढण्यास, उतरण्यास उपयोग होणार

पिंपरी-चिंचवड : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपुलावर चढण्यास आणि उतरण्यासाठी रॅम्प बांधण्याचाच निर्णय महापालिकेने घेतला आहे. रॅम्पला भाजपचे स्थानिक नगरसेवक शैलेश मोरे यांच्यासह रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. मात्र, तो मोडित काढत तब्बल 12 कोटी 69 लाखांचा हा रॅम्प होणार आहे. या सहापदरी उड्डाणपूलाच्या दुतर्फा सायकल टॅक, पादचारी मार्ग, नागरिकांच्या सुरक्षेसाठी क्रॅश बॅरिअर, नॉईज बॅरिअर, वाहनांसाठी रॅम्प अशी या पुलाची वैशिष्टये निश्‍चित करण्यात आली.

जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचा पूल
महापालिकेने जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत (जेएनएनयूआरएम) अकरा किलोमीटर लांबीच्या काळेवाडीफाटा ते देहू – आळंदी (219.20) या बीआरटी प्रकल्पाअंतर्गत सुमारे 1600 मीटर लांबीच्या चिंचवड – एम्पायर इस्टेट येथील उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सन 2011 मध्ये निविदा प्रसिद्ध करण्यात आली. रेल्वे, नदी आणि रस्त्यांना जोडणारा हा उड्डाणपूल पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लांबीचा असल्याचा महापालिकेचा दावा आहे. सहापदरी उड्डाणपूलाच्या दुतर्फा सायकल टॅक, पादचारी मार्ग, नागरिकांच्या सुरक्षेसाठी क्रॅश बॅरिअर, नॉईज बॅरिअर, वाहनांसाठी रॅम्प अशी या पुलाची वैशिष्टये निश्‍चित करण्यात आली. या बांधकामासाठी 30 महिन्यांचा कालावधी अपेक्षित धरण्यात आला. या उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मुख्य उड्डाणपुलावर चढण्यास आणि उतरण्यासाठी रॅम्प बांधण्यात येणार आहे.

रॅम्प पुर्ततेसाठी
रॅम्पसाठी 11 कोटी 15 लाख रूपये खर्च अधिक रॉयल्टी म्हणून 43 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 9.85 टक्के जादा म्हणजेच 12 कोटी 25 लाख रूपये अधिक 43 लाख रूपये रॉयल्टी असा दर सादर केला. इतर ठेकेदारांपेक्षा हा दर कमी असल्याने निविदा स्वीकृत करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 11 जानेवारी 2018 रोजी मान्यता दिली. त्यानुसार, टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा या ठेकेदारांकडून 12 कोटी 69 लाख रूपये खर्चात रॅम्प उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.