शिलाँग । भाजपने देशभरात गोमांस विक्री आणि कत्तलखान्यांविरोधात भूमिका घेतलेली असताना मेघालयात मात्र त्यांच्या पक्षाच्या नेत्याने केंद्रात मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून बीफ पार्टीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजक असलेले उत्तर गारो हिल्सचे अध्यक्ष बाचू चामबुगॉन्ग मारक यांनी फेसबुकच्या माध्यमातून या पार्टीसाठी सगळ्यांना आंमत्रित केले आहे. त्यामुळे भाजपची गोमांसाबद्दक नक्की भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ईशान्य भारतातील भाजपच्या नेत्यांनी याआधीही गोमासाबद्दल पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे.
एकीकडे भाजपने देशभरात गोमांस विक्रीवर बंदी घातली आहे. काही राज्यांमध्ये गोमांस तस्करीच्या निव्वळ संशयावरून स्वत:ला गोरक्षक म्हणवणार्यांनी लोकांना ठारही मारलं आहे. लोकांनी काय खावं हे आता सरकार ठरवणार का, असा प्रश्न विचारत विरोधकांनी हा मुद्दा तापवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना फारसं यश आलं नव्हतं. बीफ खाण्याच्या मुद्द्यावरून सध्या केरळमध्ये वातावरण पेटलं आहे. केंद्र सरकारने दुभत्या जनावरांच्या कत्तलीवर बंदी घातली होती. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेची सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तर पश्चिम बंगाल, त्रिपुरा, व केरळ या राज्यांनी आपल्या राज्यात गोमांस बंदी लागू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गोमांसवर भाजपची दुहेरी भूमिका?
दरम्यान गोमांसासंदर्भात भाजपचीही दुहेरी भूमिका आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मेघालयचे प्रभारी नलिन कोहली यांनी बाचू यांचे निमंत्रण व्हायरल होण्याआधी एका संमेलनाला संबोधित केले. प्रत्येक राज्याने स्थानिक नागरिकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी लक्शात घेऊन कायदे बनवायला पाहिजेत. ईशान्य भारतात लोक गोमांस खातात हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे. गोहत्येवर केंद्र सरकार नाही, राज्य सरकार कायदा करेल, असे कोहली यांनी म्हटले होते.