15 दिवसात शहर खड्डे मुक्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन
खड्यांवरुन विरोधी पक्षनेत्याने डागली तोफ
पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरात मागील तीन महिन्यांपासून रस्त्यांच्या डांबरीकरणाची अनेक कामे करण्यात आली आहेत. काही कामे सुरु आहेत. अशात पावसाळा सुरु झालेला असून मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसात नुकत्याच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा पिंपरी-चिंचवडकरांना मानसिक, आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डा चुकविताना एका होतकरु तरुणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचारयुक्त कारभारातून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवून ते पिंपरी-चिंचवडकरांच्या जीवाशी खेळण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने 15 दिवसात शहर खड्डेमुक्त करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी सणसणीत टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या काळात रस्त्यांची स्तुती
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दत्ता साने यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची 15 वर्षे सत्ता होती. आमच्या काळात रस्त्याचा विकास आम्ही केला. बहुतांश रस्ते खड्डेमुक्त असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुखकर झाले होते. त्याबाबत थेट शहरात व बाहेरच्या राज्याचे नागरिक या रस्त्यांची स्तुती करत असत. तसेच आमचे नेते अजित पवार पावसाळा सुरु होण्याअगोदर दोन महिने अगोदर योग्य नियोजन करायचे. जेणेकरून पावसाळ्यात रस्ते खड्डे विहरीत राहतील याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन प्रशासनास आदेश देत असत. त्यामुळे आमच्या काळात रस्त्यांची अशी चाळण होत नसे.
संस्थानिक तयार झाले
राष्ट्रवादी काँग्रेसची अनेकवर्षे सत्ता होती. त्यांच्या काळात रस्त्यांकडे विशेष लक्ष दिले गेले आहे. त्याकाळात पिंपरी-चिंचवडकरांना
हाल अथवा मनस्ताप सहन करावा लागत नव्हता. परंतु सध्या सगळेच बदलले आहे. या शहराला दोन आमदार व सत्ताधारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून दोन संस्थानिक तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक फायद्याचे ठेके (टक्केवारी) आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी कुतरओढ सुरु आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नाकडे लक्ष द्यायला सत्ताधारी भाजपा व प्रशासनाला वेळच नाही. येत्या 15 दिवसात संपूर्ण शहर खड्डे मुक्त शहर करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साने यांनी दिला आहे.