पिंपरी-चिंचवड : संरक्षण खात्याशी निगडीत असलेले शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी दिल्लीत केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्याला शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्नांची माहिती देण्यात आली. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर भाजप पदाधिकारी पुन्हा संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत बैठक घेणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. शिष्टमंडळात सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांचा सहभाग होता.
प्रश्न पडले लांबणीवर
शहरातील रेडझोनचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तळवडे, रुपीनगर, चिखली हा पट्टा रेडझोनच्या हद्दीत येतो. बोपखेल आणि पिंपळे-सौदागर येथील रक्षक चौकातील रस्ता लष्कराने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षणासंदर्भातील सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, गोव्यातील राजकीय तिढ्यानंतर त्यांना पुन्हा गोव्यात परतावे लागले. त्यामुळे संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न लांबणीवर पडले आहेत.
गडकरींनी दर्शविली सकारात्मकता
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. संरक्षण खात्यासंदर्भातील शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी गडकरी यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर संरक्षणमंत्री अरूण जेटली यांच्यासमवेत बैठक घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.