हैदराबाद : भाजप लोकशाही मार्गानेच पुढे जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीला कधी भाजपमध्ये थाराच नव्हता असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. सिकंदराबाद इथे भारतीय जनता युवा मोर्चाला संबोधित करताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर उल्लेख न करता जोरदार टीका केली.’ आम्ही घराणेशाहीचं राजकारण कधी केलंच नाही. तसंच जात,धर्म आणि वंशांचेही राजकारण केलं नाही’ असं गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले ‘भारत गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे. इथे पंतप्रधानांचा मुलगा पंतप्रधान होतो, मुख्यमंत्र्याचा मुलगा मुख्यमंत्री. यामुळे काही ठराविक लोकांच्या हातात पैसा आला तर बाकी सगळा देश गरीबच राहिला. हे आता बदलायला हवं, लोकशाहीसाठी ते घातक आहे,’असंही गडकरी म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप मात्र लोकशाही मार्गानेच पुढे जाणारा पक्ष आहे. घराणेशाहीला कधी भाजपमध्ये थाराच नव्हता . ‘एकेकाळी अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी भारताचं नेतृत्व करत होते. आज मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शहा या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. मी, राजनाथ सिंहही पक्षाचे अध्यक्ष होतो’, असंही त्यांनी सांगितलं. तसंच दक्षिण भारतात नदी जोड प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं आश्वासनही गडकरींनी दिलं. गोदावरी,कावेरी नदीच्या प्रश्नांमध्ये जातीने लक्ष घालून ते सोडवू असं गडकरी यांनी सांगितले.