भाजप सरकारची धोरणे शेतकरीविरोधी

0

भोर । राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव नाही, कष्टकरी वर्गाला योग्य मोबदला मिळत नाही, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत, सर्वसामान्य जनता महागाईने होरपळत आहे. सत्ताधारी सरकारची सर्व धोरणे शेतकरीविरोधी आहेत. यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला असून, त्यासाठी हल्लाबोल आंदोलने करावी लागत आहेत. हे असले सरकार काय कामाचे, असे प्रतिपादन करून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली.

भोर तालुक्यातील वीसगांव खोर्‍यातील बाजारवाडी आणि पळसोशी येथील सुमारे 56 लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. रणजीत शिवतरे, चंद्रकांत बाठे, मंगल बोडके, लहूनाना शेलार, भालचंद्र जगताप, मनोज खोपडे आदी मान्यवरांसह बाजारवाडीचे आणि पळसोशीचे ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
बाजारवाडी येथील गावठाण, मानकरवाडी येथील प्रगती पथावर असलेले ग्राम सचिवालय, दलित वस्तीवरील रस्ता काँक्रिटीकरण, गटारे, मानकरवाडीतील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण, दलितवस्ती लक्ष्मी मंदिर, स्मशानभूमी शेड आणि सुशोभीकरण, दोरजाईमाता मंदिर, रमाई आणि यशवंत घरकुल योजनेतील 19 घरकुले आदी कामांची उद्घाटने, भूमिपुजने तसेच पूर्ण काम झालेल्या स्मशानभूमी शेड, रस्ता काँक्रिटीकरण, जिल्हा परिषद, शाळा संरक्षक भिंत, गावठाण ते जिल्हा परिषद शाळेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती आदी 42 लाख रुपये खर्चाच्या कामांचे उद्घाटन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. पळसोशी येथील सुमारे 15 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपुजन, उद्घाटन खासदार सुळे यांचे हस्ते झाले. कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेस 5 संगणक, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, अपंगांसाठी फिल्टरचे पाणी तसेच, भजनी मंडळास भजन साहित्याचे वाटपही खासदार सुळे यांचे हस्ते करण्यात आले.