हनुमंत साठे – महेश शिंदे यांचा इशारा
पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागावाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप-सेनेकडून डावलल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे अध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2014 मध्ये रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापण्यासाठी जीवतोड मेहनत केली. मात्र, सध्या आठवले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अवहेलना होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेविरोधात प्रचार करून ’भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ, असा इशारा साठे आणि शिंदे यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिला. महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे, संदेश साळवे, यांच्यासह आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपने जातीयवादी भूमिका दाखवली
महेश शिंदे म्हणाले, 2014 च्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाला सत्ता मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली. केंद्रात दोन मंत्रिपद आणि सत्तेत 10 टक्के वाटा देण्याचे आश्वासन भाजपने दिले. मात्र ती आश्वासने पाळली नाहीत. युती व्हावी, यासाठी आठवले यांनी प्रयत्न केले. मात्र युती झाल्यावर आठवलेंनाच दुर्लक्षित केले जात आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या महामंडळ नियुक्त्यांमध्ये चळवळीशी संबंध नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून भाजपने जातीयवादी भूमिका दाखवून दिली आहे. याचा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र रोष आहे. यावेळी हनुमंत साठे, संगीता आठवले यांनीही मनोगत व्यक्त केले.