पालघर (संतोष पाटील) : मोठा गाजावाजा करत महाराष्ट्र सरकारने पालघरला जिल्ह्याचा दर्जा दिला. मात्र जिल्ह्याला लागणार्या सोयीसुविधा देण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. आदिवासी बहुल या जिल्ह्यात आरोग्य सेवासुविधांविषयी तर कायमच टिका केली जाते. मात्र आता पालघरमधील आरोग्ययंत्रणा किती कूचकामी ठरत आहे, याचा पुरावाच मिळाला आहे. तब्बल 12 तास एका 9 वर्षांच्या चिमुरडीला मृत्यूशी झुंज द्यावी लागली. तिही रुग्णवाहिकेत… कारण पालघरमध्ये तिच्यावर वेळेत वैद्यकीय उपचार व्हावेत, अशी यंत्रणाच नव्हती… अखेर त्या जखमीअवस्थेतील मुलीला मुंबईत दाखल करावे लागले. मात्र इथेही तिची मृत्यूशी झुंज सुरूच आहे.
वेळ संध्याकाळच्या साडेपाचची रुपाली आपल्या घराजवळच्या परिसरात खेळत होती. तेव्हा खेळता खेळता रुपाली कुंभाची फळे तोडण्यासाठी झाडावर चढली. मात्र त्याच झाडावरून महावितरणची वीजवाहिनीही गेली होती. त्याच वीजवाहिनीला रुपालीचा स्पर्श झाला आणि त्या उच्चदाबाचा वीज पुरवठा सुरू असलेल्या वीजवाहिनीला रुपाली चिकटली. जवळपास 5 मिनिटे ती त्याच अवस्थेत होती. त्या पाच मिनिटांनंतर रुपालीची मृत्यूशी लढाई सुरू झाली. ती अजूनही सुरुच आहे. आईविना वाढत असलेली रुपाली आता मुंबईच्या नायर रुग्णालयात मृत्यूशी झुंजतेय. पालघरच्या एका लहानशा गावातून मुंबईच्या नायर रुग्णालयापर्यंतचा रुपालीचा प्रवास अतिशय भयानक आहे. हा प्रवास समजल्यानंतर संताप अनावर नाही झाला तरच नवल… आजही पालघरचे लोक जगण्यासाठी किती धडपड करताहेत हेही या घटनेवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
रुपालीला विजेच्या तारेचा जोरदार झटका बसला. सुमारे 5 मिनिटे ती विजेच्या तारेला चिटकून राहिली होती. त्याचवेळेच त्या झाडाच्या शेजारीच असलेल्या उसाचा रस विकणार्या रंजित रायात आणि काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. रायात यांनी तात्काळ वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्यांना फोन केला. तिथल्या कर्मचार्यांनी लागलीच त्या वीजवाहिनीचा पुरवठा खंडित केला. त्याबरोबर रुपाली खाली फेकली गेली. तिला जबर दुखापत झाली. शिवाय वीजेच्या तारेचा झटका लागल्याने ती 40 टक्के भाजलीदेखील…
पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायत हद्दीतील सज्जन पाडा-वरचा पेठा येथे राहणारी आणि जि. प. शाळेत इयत्ता 3 रीत शिकणारी 9 वर्षाची चिमुकली रुपाली वरठा हिला काल सायंकाळी तिच्या घराजवळच्या राज्य महामार्गालगतच्या मोठ्या प्रवाहाच्या वीजवाहिनीचा झटका लागून ती गंभीर जखमी झाली. काल सायंकाळी झालेल्या या दुर्घटनेनंतर आज खर्या अर्थाने नायर रुग्णालायात सकाळी 9 वाजल्यापासून रुपालीवर उपचार सुरू करण्यात आले, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले.
पालघर ते मुंबई या दरम्यानचा प्रवास जवळपास साडेतीन तासांचा आहे. मात्र जखमी रुपालीला हाच प्रवास कापण्यास तब्बल 12 तास लागले. तेही भाजल्याच्या जखमा घेवून… रुपाली संध्याकाळी साडेपाच वाजता जखमी झाली. त्यानंतर वडील, भाऊ आणि अन्य 3 जणांनी रुपालीला रुग्णवाहिकेतून ठाणे जिल्हा रुग्णालायात रात्रीच्या सुमारास आणले. तिथे तिला दाखल करून उपचार सुरू केले. मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मेंदूतून रक्तस्त्राव होत असल्याचे सांगून सर्जन यांनी मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र मुंबईला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुपालीला ढवळेतून पुन्हा ग्रामीण रुग्णालाय येथे हलवण्यात आले. तिथे डॉ. म्हात्रे यांनी तिला योग्य ते उपचार दिले व पुढे तिला मुंबईला नेण्यासाठी ट्रॅफिक जाम असल्याने पर्यायी बर्न केयरसाठी जिल्हा रुग्णालाय ठाणे येथे नेण्यास सांगितले. पण ठाणे येथे नेण्यासाठीदेखील एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. 108 रुग्णवाहिका ब्रेक डाऊन असल्याने तब्बल अर्धातास रुपालीला तिथेच ठेवण्यात आले. त्यानंतर खाजगी रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र तिच्यासोबत येण्यास डॉक्टर नव्हते. कारण त्यावेळी रुग्णालायात एकच डॉक्टर उपस्थित होते. त्यामुळे ते रुग्णासोबत जाऊ शकले नाहीत. पर्यायी मासवणवरून आलेल्या पाटील सिस्टर यांनी रुपालीसोबत येण्याची तयारी दर्शवली. त्या जखमी अवस्थेत असलेल्या रूपालीला उपचारासाठी दुसर्या रुग्णालयात नेण्याची धडपड सुरू झाली. हे सर्व करत असताना पत्रकार निखिल मेस्त्री, उपसरपंच अजय पाटील व परिसरातील ग्रामस्थांची मोठी मदत मिळाली.
दरम्यान, प्रसंगावधान राखत तिला मासवण पीएचसीला नेण्यात आले. रुपालीची परिस्थिती फारच गंभीर असल्याने तेथे तात्पुरते उपचार करून तिला ग्रामीण रूग्णालाय पालघर येथे आणण्यात आले. तिथेही तिच्यावर उपचार सुरू झाले. मात्र योग्य त्या सुविधा नसल्याने तिला पालघरमधील ढवळे दवाखान्यात पाठवण्यास सांगितले. पुन्हा जखमेने विव्हळत असलेल्या रुपालीला 108 रुग्णवाहिकेने मुंबईत आणण्यात आले. मात्र मुंबईतही रुपालीला रुग्णालयात दाखल करण्यासाठीही प्रचंड वेळ लागला. सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्यातच खूप वेळ गेला. तेव्हा तब्बल अर्धा ते पाऊण तास तिला त्याच अवस्थेत राहावे लागले. अखेर रुपालीच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. आणि मग शेवटी आज सकाळी 9 वाजता रूपलीला नायर रुग्णालायात दाखल करण्यात आले. काल सायंकाळी 5.30 ला रुपालीला अपघात झाल्यानंतर सुमारे 10 ते 12 तासानंतर तिच्यावर खर्या अर्थाने उपचार सुरू झाले. रुपालीची प्रकृती गंभीर असून सध्या तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
डॉ. दिपक सावंत राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. रुपालीची कथा त्यांना समजली असेल, अशी अपेक्षा बाळगण्यास काहीच हरकत नाही. पण व्यथा केवळ एका रुपालीची नाहीय. तर संपूर्ण पालघर जिल्ह्याची आहे. पालघर जिल्ह्यातील आरोग्यसेवांची यंत्रणाच निष्काम ठरत आहे. रुग्णाला तातडीने मोठ्या रुग्णालयात दाखल करायचे असेल तर रुग्णवाहिकाही इथे उपलब्ध होत नाही, हे वास्तव आहे. यासर्व बाबींची गंभीर दखल आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत घेणार का हा खरा प्रश्न आहे.
म्हणून त्यांना गुजरात आपलं वाटतं
पालघर जिल्हा हा महाराष्ट्रा असला तरीही या जिल्ह्यातील लोकांना गुजरात राज्य आपलंसं वाटतं. याचं कारण उघड आहे. गुजरातमधील वापी शहर पालघरच्या लोकांच्या गरजा पुरवण्यास यशस्वी ठरत आहे. पालघरपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या वापी शहरात सर्वच सोयीसुविधा उपलब्ध असल्याने पालघरमधील जनता तिकडेच जाते. वैद्यकिय उपचारांसाठी तर अवघा पालघर जिल्हा याच वापी शहरावर अवलंबून आहे. त्यामुळेच नव्याने निर्माण केलेला हा महाराष्ट्रातील जिल्हा गुजरात राज्याकडे अधिक कलताना दिसतोय. सरकारने ही बाब गांभीर्याने घेणे अपेक्षित आहे.