पुणे । पुणे शहरासाठीचा एकात्मिक सायकल आराखडा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तयार केला असून, आराखड्यातील तरतुदीच्या अनुषंगाने भाडेतत्त्वावर सायकली देण्याचे धोरण (पुणे पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टिम-पीबीएस) महापालिका प्रशासनाने तयार केले आहे. या योजनेसंदर्भातील करार करण्यास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
पुणे शहरात सायकल चालविण्याचे प्रमाण वाढविणे, त्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणे, हा या धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. सायकलीचा वापर वाढल्याने स्वयंचलित दुचाकींचा वापर आणि प्रदूषण कमी होईल, असा दावा आयुक्तांनी केला आहे. शहरात सायकल विक्रेते, त्यांची दुरुस्ती करणारे, तसेच सायकली भाड्याने देणारे दुकानदार आणि स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून सध्याच्या अडचणी जाणून घेऊन धोरण आखण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.पीबीएस योजनेनुसार एक लाख सायकलींचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून, शहरातील रस्त्यांवर सायकली भाड्याने देण्यासाठी स्टेशन तयार करण्यात येणार आहेत. ही योजना राबविण्याबाबत काही खासगी संस्थांनी महापालिकेकडे विचारणा केली असून, त्या स्वखर्चाने या योजनेत सहभागी होऊ इच्छित आहेत. या योजनेद्वारे ठेकेदार स्वतः गुंतवणूक करणार असून त्याचा कुठलाही ताण महापालिकेवर येणार नसल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.पीबीएस संस्थांनी स्वंयचलित सार्वजनिक सायकल सेवा देणे आवश्यक आहे. चांगल्या गुणवत्तेची, किफायतशीर आणि सर्वस्तरातील नागरिकांना वापर करता येवू शकेल, अशी सेवा देणे बंधनकारक आहे. महापालिकेकडून उपलब्ध करण्यात येणार्या पार्किंगमध्ये सायकल लावणे बंधनकारक असेल.
पीबीएस संस्थाचालकांनी शाळा, कॉलेज, हाउसिंग सोसायटी, व्यापारी संघटना आदींना सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे. महापालिका या धोरणाबाबत ‘पीबीएस’ संस्थांशी करार करणार असून त्याच्या मसुद्याला स्थायी समितीची मान्यता मिळाली आहे.