आरोपींना आज न्यायालयात हजर करणार ; पॉलिग्राफी चाचणीतील तथ्यानंतर कारवाई
जळगाव- तब्बल सव्वा वर्षानंतर भादली हत्याकांड प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या पॉलिग्राफी चाचणीतील अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रमेश बाबूराव भोळे व प्रदीप उर्फ बाळू भरत खडसे अशी अटकेतील आरोपींची नावे असून शुक्रवारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
14 महिन्यांनंतर आरोपींच्या आवळल्या मुसक्या
बहुचर्चित भादली हत्याकांडात प्रदीप सुरेश भोळे (45), मुलग्या दिव्या (सात) व मुलगा चेतन (तीन) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. तब्बल 14 महिन्यापर्यंत पोलीस या गुन्ह्याच्या भोवती फिरत होते तरीही त्यांना ठोस पुरावे मिळत नव्हते. पोलिसांनी अखेर या गुन्ह्यातील आठ जणांची पॉलिग्राफी चाचणीची परवानगी न्यायालयाकडून मिळवल्यानंतर भोळे व खडसे हे माहिती लपवत असल्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्याने गुरुवारी रात्री उशिरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. 4 जानेवारी 2018 रोजी बाळू भरत खडसे याचा भाऊ दीपक खडसे याने 4 जानेवारी 2018 रोजी विहिरीत तलवार व चॉपर फेकल्याचे उघडकीस आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सहा जणांची ब्रेन फिंगर प्रिंटींग (बीएफपी) व लेयर्ड व्हाईस अॅनालिसीस (एलव्हीए) परीक्षण करण्यासाठी न्यायालयाची परवानगी मागण्यात आल्याचे समजते. दरम्यान, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासाठी या गुन्ह्याचा तपास हे आव्हान होते मात्र अत्यंत बारकाईने सुरू असलेल्या या तपासात आरोपींना अटक झाल्याने पोलिसांच्या कारवाईविषयी नागरीकातून समाधान व्यक्त होत आहे. अटकेतील आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एएसपी नीलोत्पल यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना दिली. दरम्यान, आरोपींनी खून का व कोणत्या कारणासाठी केला? याबाबत लवकरच उलगडा होणार आहे.