नवापूर । ग्रामपंचायत भादवड, तालुका-नवापूर येथे ग्राम सामाजिक परिवर्तन या मुख्यमंत्री कार्यालयाच्या ध्वजांकीत योजनेबाबत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेस जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगळे, पोलिस अधिक्षक राजेंद्र डहाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बीडीओ नंदकुमार वाळेकर, तहसिलदार प्रमोद वसावे, तालुका कृषी अधिकारी चौधरी तसेच सरपंच, ग्रा.प. सदस्य, ग्राम विकास अधिकारी ,ग्रामदूत यांची उपस्थिती होती.
बालकांना लोक सहभागातून अतिरिक्त आहार उपलब्ध करावा
गावात कमी वजनाच्या बालकांना लोक सहभागातून अतिरिक्त आहार उपलब्ध करावा.अंगणवाडी सेविकांनी परस बागेला प्रोत्साहन द्यावे. नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन केले.स्थलांतर कमी करण्यासाठी ग्रामसभेत काम मागणी करावी याबाबतीत मार्गदर्शन केले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेच्या 11 कलमांची ग्रामसभेत चर्चा केली.नरेगा अंतर्गत कामांवर भर देऊन गावाचा विकास करावा.त्यासाठी ग्राम स्तरावरील लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणा यांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगितले.
शांतताप्रिय वातावरण राखून शासकीय यंत्रणेला सहकार्य करा
पोलिस अधिक्षक डहाळे म्हणाले की,शांतताप्रिय वातावरण राखून शासकीय यंत्रणेला नागरिकांचे सहकार्य मिळाले तर गाव आदर्श होण्यासाठी वेळ लागत नाही.सदर ग्रामसभेत ग्रामसेवक श्री.सुर्यवंशी यांनी गावातील पूर्ण झालेली आणि चालू विकास कामांचा आढावा दिला.श्रीम.आरती मोरे ग्रामदूत यांनी ग्राम परिवर्तन अंतर्गत चालू सर्वेक्षणाची माहिती दिली.कृषी सहाय्यक यांनी कृषी विभागाची सुरू कामांची माहीती दिली. लोकांनी विविध प्रश्नांवर,योजनांवर चर्चा केली आणि राज्यात भादवड हे एक आदर्श गाव बनवण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
100 टक्के शौचालय वापराबाबत आवाहन
प्रास्ताविकात बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी ग्राम परिवर्तन संकल्पना आणि योजने स्वरूप स्पष्ट केले.जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नागरीकांना 100% शौचालय वापराबाबत आवाहन केले.लोकांनी मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत शेत तळ्याचा लाभ घ्यावा.वैयक्तिक विहीरींचा लाभ घेऊन शेती उत्पादन वाढवावे.गावात दारूबंदी करण्यासाठी आवाहन केले त्यास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.