भानोबा देवस्थानला ‘क’ दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील

0

शेलपिंपळगाव । कोयाळी भानोबाची या देवस्थानाला दरवर्षी अनेक जिल्ह्यांतून भाविक भेट देतात. जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या यात्रांपैकी भानोबाची यात्रा आहे. यात्रा काळात ग्रामपंचायतीवर सोयी सुविधा पुरविताना ताण येतो. त्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या देवस्थानाला ’क’दर्जाचे देवस्थान म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हाधिकार्‍यांकडून या प्रस्तावास मान्यता मिळाली असून उर्वरित कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर आगामी काळात देवस्थानास शासनाकडून यात्रा व विकास कामांसाठी निधी मिळण्यास सुरुवात होईल, असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले.

खेड तालुक्यातील कोयाळी भानोबाची येथील शेलगाव ते कोयाळी या रस्त्याच्या खडी व डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गोरे बोलत होते. शेलगाव ते कोयाळी रस्ता दुरुस्तीची मागणी कोयाळी ग्रामस्थांकडून वारंवार केली जात होती. या मागणीची दखल घेत स्थानिक विशेष निधी अंतर्गत 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या निधीअंतर्गत या कामाला सुरुवात झाली. यावेळी बापूसाहेब थिटे, धनंजय पठारे, निर्मला पानसरे, रेखा साबळे, रेश्मा बनसोडे, बापू सरोदे, भरत आल्हाट, मंगेश आल्हाट उपस्थित होते.

यात्रेदरम्यान अखंड वीजपुरवठा ठेवा
पुढील आठवड्यात होणार्‍या भानोबा यात्रेदरम्यान अखंड वीजपुरवठा सुरू ठेवण्याची सूचना उपस्थित महावितरण अधिकार्‍यांना आमदार गोरे यांनी केली. शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर यांनी आपल्या भाषणात तालुक्यात केलेल्या विकास कामांमुळे आमदारांना ’विकासाचा महामेरु’ म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे सांगितले. गोरक्ष पोकळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.