आमदार जगताप, लांडगे यांचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे!
पिंपरी-चिंचवड : शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या भामा आसखेड प्रकल्पांतर्गत धरण क्षेत्रात कपात होणार्या 5339.19 हेक्टर सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापन खर्च माफ करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. नागपूरात सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान त्यांना मागणीचे निवेदन दिले.
महापालिकेला शक्य नाही
निवेदनात म्हटले आहे, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, सद्यस्थितीला शहराची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात आहे. महापालिका क्षेत्र प्रामुख्याने पवना आणि इंद्रायणी नदीच्या परिसरात विस्तारले आहे. शहराचा विकास हा मुख्यत: पवना नदीच्या परिसरात झालेला आहे. तसेच, इंद्रायणी नदीच्या परिसरातील भाग नव्याने विकसित होत आहे. भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली, चर्होली, वडमुखवाडी, दिघी, मोशी आदी भागाच्या यामध्ये समावेश होतो. दरम्यान, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी भामा आसखेड धरण क्षेत्रातील कपात होणा-या 5339.11 हेक्टर सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापना खर्चापोटी रुपये 7933.92 लाख रुपये जमा करुन करारनामा करावा, असे पत्राद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला कळवले आहे. मात्र, सद्यस्थितीला शहरात मूलभूत सोई-सुविधा तसेच पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येणार आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाला सिंचन क्षेत्राच्या पुन:स्थापना खर्चासाठी 7933.92 लाख रुपये खर्च महापालिका अर्थसंकल्पातून अदा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे हा खर्च माफ करावा.