कडेकोट पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी
चाकण: भामा आसखेड प्रकल्पबाधित शेतकर्यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी जबरदस्तीने बंद केल्यानंतर चाकण पोलिसांत सुमारे शंभर प्रकल्पग्रस्तांवर शनिवारी (दि. 7) रात्री गुन्हे दाखल करण्यात होते. यानंतर सोमवारी (दि.9) कडेकोट पोलीस बंदोबस्तात धरण प्रशासनाने सकाळी अकरा वाजता भामा आसखेड धरणाच्या आयसीपीओ मधून नदीपात्रात 800 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
पुनर्वसन झालेले नाही, पर्यायी जमिनी मिळालेल्या नाहीत, अनेक प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटल्याशिवाय धरणातून एक थेंबही पाणी सोडू देणार नसल्याची भूमिका घेत शुक्रवारी (दि.6) सकाळी आकाराचे सुमारास सुमारे 80 ते 100 प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी करंजविहीरे (ता. खेड) येथील भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनच्या उपविभागीय अधिकार्यांच्या कार्यालयात बळजबरीने येऊन चालू वर्षीच्या उन्हाळ्यातील पहिले आवर्तन रोखले होते. त्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागासह अन्य तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली होती. त्यामुळे संबधित शेतकर्यांच्या विरोधात चाकण पोलिसांत धरण प्रशासनाने गुन्हे दाखल केल्या नंतर सोमवारी ( दि.9 ) भामा आसखेड धरणातून कडेकोट पोलिस बंदोबस्तात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
दरम्यान 29 मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार 1 एप्रिलला भामा आसखेड मधून पाणी सोडण्यात येणार होते. परंतु भामा आसखेड आंदोलकांनी अधिकार्यांना निवेदन देऊन ते थांबविले. त्यानंतर 5 एप्रिलला सायंकाळी सहाच्या सुमारास भामा आसखेड धरणातून प्रशासनाने पाणी सोडले. या प्रकाराची माहिती धरणग्रस्त शेतकर्यांना मिळाली. त्यानंतर दुसर्याच दिवशी शुक्रवारी ( दि.6 ) प्रकल्पग्रस्त नागरीक करंजविहीरे येथे जमा झाले आणि त्यांनी धरण विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे यांना निवेदन असताना पाणी सोडल्याबद्दल जाब विचारला आणि पाणी बंद करण्याची मागणी केली. आक्रमक शेतकर्यांच्या मागणीमुळे अधिकारी मेमाणे यांनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले होते. त्यानंतर मेमाणे यांनी चाकण पोलिस ठाण्यात आंदोलकांविरुद्ध तक्रार दिली आणि पोलिसांनी 19 आंदोलकांसह अन्य 80 ते 100 जणांवर गुन्हा दाखल केला होता. धरणग्रस्त शेतकर्यांच्या आग्रही भूमिकेमुळे पाणी सोडण्यास विलंब झाल्याने धरणाच्या खालील भागातील नागरिकांमधून पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे सोमवारी धरणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून अधिकार्यांनी पाणी सोडले आहे.
धरणाला छावणीचे स्वरूप
उन्हाळी आवर्तन सोडण्यास झालेला विलंब आणि पाण्याची मागणी लक्षात घेता सोमवारी ( दि.9 ) सकाळी पावणे अकराच्या सुमारास धरणाच्या आयसीपीओ मधून नदीपात्रात 800 क्युसेस वेगाने पाणी सोडण्यात आले. यावेळी चाकणचे पोलिस निरीक्षक मनोज यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार,यांच्यासह सुमारे सत्तर पोलिसांचा फौजफाटा धरण परिसरात तळ ठोकून होता. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे धरणग्रस्त शेतकरी या भागाकडे फिरकलेच नाहीत. धरण प्रशासनाच्या वतीने यावेळी भामा आसखेड धरण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे,भारत बेंद्रे, के.डी.पांडे आदी उपस्थित होते. येथील स्थितीवर लक्ष देण्यासाठी खेड तहसीलदार सुनील जोशी आणि उपविभागीय अधिकारी राम पठारे यांनी धरणावर भेट दिली.