भारतरत्न सावित्रीबाई!

0

स्त्री शिकली आणि प्रगत झाली. आज विविध क्षेत्रांत महिला अतिशय आत्मविश्‍वासाने वावरत आहेत. आपापल्या क्षेत्रात त्यांनी नालौकिक प्राप्त केला आहे. असे एकही क्षेत्र आज नाही, ज्यामध्ये महिलांचा समावेश नाही. कालपरवाच भारतीय वायूसेनेतील पायलट अवनी चतुर्वेदी या 28 वर्षांच्या मुलीने मिग-21 हे लढावू विमान एकटीने चालवून इतिहासात स्वत:च्या नावाची नोंद केली आहे. अवनीचे देशभरात कौतुक झाले, अशा असंख्य अवनी आपल्या महाराष्ट्रातही आहेत. त्यादेखील आपल्या क्षेत्रात पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करताना दिसतात. उद्योग, क्रीडा, लष्कर, शिक्षण, पोलीस दल, राजकारण, समाजसेवा असो की आयटी, प्रत्येक क्षेत्रात सावित्रीच्या लेकींनी आपला ठसा उमटवला आहे. याचे श्रेय जाते ते क्रांतीज्योती सावित्री फुले यांना. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचे स्मरण करावेच लागेल. त्यांच्या स्मरणाशिवाय किमान महाराष्ट्रात तरी महिला दिन साजरा होणे अशक्यच! महिलांसाठी पहिल्यांदा ज्ञानाची कवाडे खुली करणार्‍या या मातेला आमचे अभिवादन! शिक्षणाची गंगा चुलीपर्यंत पोहोचवणारी ही माता खरी भारतरत्न आहे.

महाराष्ट्र राज्य हे देशातच नव्हे, तर जगभरात शिक्षणाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. देशासह परदेशातूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात. यामध्ये मुलींची संख्याही खूप मोठी आहे. विशेष म्हणजे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुणे म्हणजे शिक्षणाची पंढरी. येथे आज लाखो मुलेमुली विविध शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनी येथून शिक्षण घेऊन बाहेर पडले असून, मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे, हे अधिक सकारात्मक म्हणता येईल. शिक्षणाचे माहेरघर म्हणून आज मानाने मिरवणारे पुणे हे पूर्वी शिक्षणाचे शत्रू होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण याच पुण्यात शिक्षणाची सोय नसल्याने महात्मा जोतिबा फुलेंनी इ.स. 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या शाळेला शिक्षिका मिळाल्याने अखेर जोतिबांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनाच शिक्षित करून मुलींना ज्ञानदान करण्याच्या कार्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. सावित्रीबाईंनी या संधीचे सोने केले. समस्त स्त्रीजातीचा उद्धार केला. शिकलेली स्त्री या मातेला आज त्याचे किती श्रेय देते, हा वादाचा मुद्दा आहे. जात, धर्माच्या अलीकडे वाढलेल्या स्तोमात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा विसर खुद्द महिलांनाच पडला की काय, अशी शंका येते. ज्या मातेने अनेक हालअपेष्टांना तोंड देत; सनातनी लोकांकडून होणारा अपमान सहन करत महिलांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचले त्याच मातेच्या उपकारांची जाणीव आपल्या मनात नसेल तर यापेक्षा कृतघ्नपणा आणखी काय असू शकतो? सावित्रीबाईंनी ज्ञानदानाचे कार्य करताना कधीही जातपात पाहिली नाही. उलट त्यांनाच कनिष्ठ जातीच्या समजून अनेक उच्चवर्णीयांनी मिळेल त्यामार्गाने छळण्याचे काम त्याकाळी केले हे सर्वश्रुत आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय जनतेवर रुढी, परंपरा, जात, धर्म, उच्च-नीच अशा गोष्टींचा प्रचंड पगडा होता, अशा काळात सावित्रीबाईनी महिलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केले. त्या काळात चूल आणि मूल एवढ्यापुरतीच स्त्री मर्यादित होती. अशावेळी तिला शिक्षणासाठी घराबाहेर आणणे हे मोठे धाडस होते. धर्माच्या नावाखाली वर्चस्व गाजवणार्‍यांना ती चपराक होती. हे धाडस सावित्रीबाईंनी त्या काळात केले. स्त्रीला त्या काळात कोणताही दर्जा नव्हता. अशावेळी स्त्रीला शिक्षित करून नवी दिशा देण्याचे काम सावित्रीबाईंनी पुण्यासारख्या ठिकाणी केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच आज पुण्यातील विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे. आजच्या जागतिक महिलादिनी सावित्रीच्या लेकींना हीच विनंती आहे की जिच्यामुळे आपले क्षेत्र चूल आणि मूल याच्यापलीकडेही प्रचंड असे विस्तारले त्या मातेला विसरू नका. महिलांसाठी शिक्षण, स्त्रीभू्रण हत्या, दलितांसाठी शाळा, महिलांच्या केशवपनास विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, अस्पृश्यांसाठी पाण्याचे हौद खुले करणे, असे त्याकाळी अशक्यप्राय कार्य सावित्रीबाईंनी केले आहे. सावित्रीबाईंनी मुलींसाठी शिक्षणाची सोय केली तसेच दलितांसाठीही शाळा काढल्या. मुलींना आणि दलितांना शिक्षण देणार्‍या सावित्रीबाईंना पुण्यातील त्यावेळच्या समाजकंटकांनी, शिक्षणाचे हे काम बंद कर अन्यथा तुझी अब्रू शाबूत राहणार नाही, अशी धमकीही दिली होती. त्यांच्या अंगावर शेण फेकले होते. मात्र, सावित्रीबाईंनी अशा धमक्यांना कधीही भीक घातली नाही. म्हणूनच आजची महिला स्वत:च्या पायावर उभी आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळावा ही मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, राज्यकर्ते अजूनही त्यावर गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. आतापर्यंतच्या भारतरत्न पुरस्कारांची यादी पाहिली असता त्यातही महिलांची संख्या तुलनेत खूपच कमी आहे. अगदी बोटावर मोजण्याएवढीच.

इंदिरा गांधी, मदर तेरेसा, एम. एस. सुब्बुलक्ष्मी, लता मंगेशकर आणि अरुणा आसिफ अली यापुढे महिलांची नावेच दिसत नाहीत. महिलांसाठीची देशातील पहिली शाळा काढणार्‍या सावित्रीबाई फुले यांचे नाव यादीत असावे, हीच जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्यकर्त्यांना आमची विनंती आहे. समस्त स्त्रीच्या उद्धारासाठी वादळातही शिक्षणाची ज्योत पेटवून ती अखंड तेवत ठेवणारी माता सावित्रीबाई ही खरी भारतरत्न आहे. या मातेला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी आता महाराष्ट्रासह देशातील सावित्रीच्या लेकींनीच पुढाकार घेऊन शिक्षणाचा अधिकार मिळवून देणार्‍या आपल्या मातेला न्याय मिळवून दिला पाहिजे. या राज्यातील सावित्रीची एक लेक खासदार सुप्रियाताई सुळे यांना सावित्रीबाई भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी भारतीय संसदेत केली आहे. खासदार सुळे यांनी जागतिक महिलादिनी एक चांगले पाऊल उचलले असून, त्यांच्या या प्रयत्नांना यश येवो, यासाठी आज आपल्याला शिक्षणाचे क्षेत्र खुले असून शिक्षणाचा उपयोग आपल्यासाठी तसेच नवीन येणार्‍या पिढीला संस्कारशील शिक्षण देण्यात आपले योगदान देणे, हीच खरी महिलादिनी शुभेच्छा!