मोहाली । भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसर्या सामन्यात श्रीलंकेचा 141 धावांनी पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. तिहेरी द्विशतकवीर रोहित शर्मा, त्याचा मुंबईकर जोडीदार श्रेयस अय्यर (88) आणि शिखर धवनच्या 68 धावांच्या खेळीमुळे भारताने 50 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात 392 धावांचा डोंगर उभा केला.या आव्हानचा पाठलाग करतान श्रीलंकेच्या संघाला 8 बाद 248 धावाच करता आल्या. पाहुण्या संघाकडून सर्वाधिक, नाबाद 111 धावा अँजेलो मॅथ्यूजने केल्या. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आव्हानचा पाठलाग करतान श्रीलंकेचे दोन फलंदाज अवघ्या 30 धावांमध्ये बाद झाले.
रोहितसाठी खास दिवस
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने शानदार द्विशतक ठोकले. रोहितने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील 16 वे शतक आहे. रोहितचे हे द्विशतक खूप खास ठरलेे. 13 डिसेंबर हा त्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. याचदिवशी दोन वर्षांपूर्वी त्याने रितिका सजदेहसोबत विवाह केला होता. रोहितच्या या द्विशतकामुळे भारताची धावसंख्या 392 एवढी झाली. भारताच्या रोहित शर्माने मोहालीत क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. त्याने 208 धावांची नाबाद खेळी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसरे द्विशतक झळकावण्याचा भीम पराक्रम केला.
भारताचा नवीन सिक्सर किंग
रोहित शर्माने मोहालीत आपल्या नाबाद 208 धावांच्या द्विशतकी खेळीत 13 चौकारांसह 12 षटकारांचा पाऊस पाडला. या विस्फोटक खेळीमुळे रोहित भारताचा नवीन सिक्सर किंग बनला आहे. षटकार ठोकण्याच्या बाबतीत रोहितने युवराजसिंगला मागे टाकले आहे. युवराजने आतापर्यंत खेळलेल्या 304 एकदिवसीय सामन्यांमधून 155 षटकार लगावले आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात रोहित तिसरा षटकार खेचताच त्याने युवराजला दुसर्या स्थानावर खेचले. रोहितने आतापर्यंत 173 सामन्यांमधून 162 षटकार ठोकले आहेत. याशिवाय कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने 12 षटकार मारले. कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकारा मारण्याचा विक्रम द. आफ्रिकेच्या अॅबी डिविलीयर्सच्या नावावर आहे. अॅबीने एक सामन्यात 16 षटकार ठोकण्याचा उच्चांक रचला आहे.
वॉशिंग्टन सुंदरहा सातवा लहान खेळाडू आहे…
सगळीकडे रोहितच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या तिसर्या द्विशतकाची चर्चा असतानाच या सामन्यामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या सामन्यामध्ये कुलदीप यादवऐवजी फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली आहे. भारताकडून क्रिकेट खेळणारा सुंदर हा वयाने लहान असलेला सातवा क्रिकेटपटू बनला आहे. भारताकडून सगळ्यात कमी वयामध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने पदार्पण केले होते. सचिनने 16 वर्षे आणि 238 दिवसांचा असताना पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला, तर दुसर्या क्रमांकावर मनिंदर सिंग आहेत.
फक्त एका कानानेच येते ऐकू
वॉशिंग्टन सुंदरला एका कानानेच ऐकू येते. लहानपणापासूनच वॉशिंग्टन सुंदरला ही समस्या आहे. वॉशिंग्टन सुंदर 4 वर्षांचा असताना त्याच्या घरच्यांना याबाबत कळले होते. यानंतर अनेक डॉक्टरांकडे उपचार करण्यात आले, पण कानावर अजून कोणताही इलाज झालेला नाही.
दुसर्यांदा 10 व्या तीनशेहून अधिक धावा
मोहालीतील सामन्यांत विक्रमांचा पाऊस पडला आहे. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांमध्ये या वर्षात 10 व्यांदा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. सर्वाधिक तीनशेहून अधिक धावा करणार्या संघामध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून त्यांच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने एका कॅलेंडर वर्षात 11 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत.
हे आहेत द्विशतकी वीर
सचिन तेंडुलकर(नाबाद 200) विरुद्ध द. आफ्रिका(24 फेब्रुवारी 2010)
वीरेंद्र सेहवाग(219) विरुद्ध वेस्ट इंडिज (8 डिसेंबर 2011)
रोहित शर्मा (209) विरुद्ध ऑस्ट्रेलिया(2 नोव्हेंबर 2013)
रोहित शर्मा (264) विरुद्ध श्रीलंका( 13 नोव्हेंबर 2014)
ख्रिस गेल (215) विरुद्ध झिम्बाब्वे(24 फेब्रुवारी 2015)
मार्टिन गप्टिल(नाबाद 237) विरुद्ध वेस्ट इंडिज (22 मार्च 2015)
रोहित शर्मा(नाबाद 208) विरुद्ध श्रीलंका (13 डिसेंबर 2017)