गॉले । पहिल्या डावात उभारलेल्या 600 धावांच्या डोंगराच्या बळावर पहिल्या कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेचा 304 धावांनी दणदणीत पराभव केला. दुसर्या डावात दिलेल्या 550 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्याच दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या 245 धावात संपुष्टात आला. भारताने 304 धावांसह विजय मिळवीत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताचा कुठल्याही संघाविरुद्ध धावांच्या बळावर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरला तर श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव ठरला. श्रीलंकेकडून सलामीवीर करुणारत्ने (97), डिकवेला (67) यांनी पराभव काही काळ लांबवला. मात्र, भारतीय फिरकीच्या पुढे ते तग धरू शकले नाहीत. पहिल्या डावात भारताकडे 309 धावांची आघाडी होती. विराट कोहलीने सतरावे शतक करताना नाबाद 103 ठोकल्यानंतर 550 धावांचे लक्ष्य लंकेसमोर ठेवले होते. श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. थरंगाला मोहम्मद शामीने (10) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यापाठोपाठ गुणाथिलकाला (2) धावांवर उमेश यादवने पूजाराकरवी झेलबाद केले. त्यानंतर मेंडीस आणि करुणारत्ने यांनी तिस-या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी करून डावाला सावरला मात्र मेंडीसला (36) धावांवर जाडेजाने सहाकरवी झेलबाद केले. त्यानंतर मॅथ्यूजला (2) जाडेजाने लगेचच माघारी धाडले. नुआन प्रदीपला भोपळाही फोडू न देता अश्विनने माघारी धाडले.
सपशेल शरणागती
दुसर्या डावात भारतीय फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही आपली कामगिरी चोख बजावली. दुसर्या डावात सलामीवीर करुणारत्ने (97), डिकवेला (67) आणि मेंडीस (36) या तिघांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले. श्रीलंकेचे 2 फलंदाज शून्यावर, तर 2 फलंदाज 2 वर धावांवर बाद झाले. तर दोन खेळाडून मैदानात उतरलेच नसल्याने त्यांना बाद करण्यात आले. दुसर्या डावात श्रीलंकेकडून करुणारत्ने आणि मेंडीसमध्ये तिसर्या विकेटसाठी 79 आणि पाचव्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी झाली. मोक्याच्या क्षणी रविचंद्रन अश्विनने काढलेल्या तीन विकेटसमुळे श्रीलंकेची दाणादाण उडाली.
करुणारत्नेचे शतक हुकले
भारताच्या 550 धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना एकाबाजूने दमदार फलंदाजी करणार्या करुणारत्नेचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. पहिल्या डावात अवघ्या 2 धावांवर बाद झालेल्या करुणारत्नेला (97) धावांवर अश्विनने क्लीनबोल्ड केले. त्यानंतर (67) धावांची अर्धशतकी खेळी करणार्या डिकवेलाला अश्विनने सहाकरवी झेलबाद केले.