मुंबई । भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे (एलो 2297) हिने शुक्रवारी सुरेख कामगिरीचे प्रदर्शन केले. एसबीआय लाइफ-एआयसीएफ महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आकांक्षा हिने शुक्रवारी मोंगोलियाची अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर बाखुयाग मुंगूनटूल हिच्यावर चौथ्या फेरीत विजय मिळवला. मात्र, तिला विजयी सातत्य कायम राखता आले नाही. पाचव्या फेरीत भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री (एलो 2207) हिने आकांक्षाला पराभूत केले. इंडियन चेस स्कूल आणि दक्षिण मुंबई चेस अॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने ऑल इंडिया चेस फेडरेशनच्या (एआयसीएफ) अधिपत्याखाली चेंबूर येथील द एकर्स क्लबवर सुरू असलेल्या या स्पर्धेत आकांक्षाकडून चौथ्या फेरीतील विजयानंतर चांगल्या कामगिरीची अपेक्षा असताना तिला पाचव्या फेरीत हार पत्करावी लागली.
श्रीजा शेषाद्री हिचा हा सलग दुसरा विजय ठरला. श्रीजा हिने चौथ्या फेरीत भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवाल (एलो 2279) हिला हरवले होते. शेषाद्री आणि आकांक्षा यांच्यासह, वंतिका अग्रवाल आणि रशियाची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर एलेना तोमिलोव्हा यांनी प्रत्येकी 2.5 गुणांसह संयुक्तपणे सहावे स्थान प्राप्त केले आहे.
अव्वल मानांकित मुंगूनटूल हिचा आत्मविश्वास काहीसा कमी वाटत होता. मनोर्धैय खचले असताना तिला सुरेख चाली रचण्यात अपयश आले. परिणामी, तिला चौथ्या फेरीत आकांक्षाकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर सिसिलियन बचाव पद्धतीने खेळल्या गेलेल्या पाचव्या फेरीत मुंगूनटूल हिला भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिच्याविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली. दरम्यान, कझाकस्तानच्या पाचव्या मानांकित महिला ग्रँडमास्टर गुलिश्कन नाखबायेव्हा (एलो 2323) हिची चार सामन्यांची विजयी परंपरा अखेर उझबेकिस्तानची महिला ग्रँडमास्टर गुलरुखबेगिम तोखीरजोनोव्हा (एलो 2379) हिने संपुष्टात आणली. पाचव्या फेरीत गुलरुखबेगिमने गुलिश्कनला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह गुलरुखबेगिमने चार गुणांसह व्हिएतनामची महिला ग्रँडमास्टर थि किम फुंग वो (एलो 2376) हिच्यासह संयुक्तपणे अग्रस्थान प्राप्त केले आहे. थि किम हिने भारताच्या रक्षिता रावी हिच्यावर विजय संपादन केला.