नवी दिल्ली : भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. जम्मू-काश्मीरसाठी वेगळे संविधान ही एक मोठी चूक होती असे वक्तव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवल यांनी केले आहे. एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डोवल बोलत होते.
जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना कलम ३५ अ नुसार काही विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनावेळी डोवल बोलत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचा पाया मजबूत करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
डोवल बोलताना म्हणाले की, सार्वभौमत्वाला कमकुवत केले जाऊ शकत नाही ना त्याची चुकीची व्याख्याही केली जाऊ शकत नाही. इंग्रज जेंव्हा भारत सोडून गेले. कदाचित त्यांना जाताना सार्वभौम भारत नको होता, इंग्रजांच्या या कुटील डावाची योजना कदाचित पटेल यांना त्यावेळी समजली असावी. देशातील सर्व राज्यांचे एकत्रिकरण करण्यापुरतेच पटेल यांचे योगदान नव्हते तर त्याहून अधिक त्यांनी या देशाला दिले असल्याचेही त्यांनी म्हटले.