भारतातील अवघ्या 1% लोकांकडे 58% संपत्ती!

0

दाबोस । भारतातील एकूण 58 टक्के संपत्तीवर केवळ एक टक्का श्रीमंतांचे वर्चस्व आहे. देशातील या आर्थिक विषमतेचा भंडाफोड विश्‍व आर्थिक परिषदेच्या वार्षिक बैठकीपूर्वी ‘ऑक्सफॅम‘ या अधिकारी समुहाने केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून झाला आहे. भारतातील 57 अब्जाधीशांकडे एकूण 216 अब्ज डॉलर एवढी संपत्ती एकवटलेली असून, ही संपत्ती देशातील 70 टक्के लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीच्या एवढी आहे. जागतिक पातळीवर विचार करता, जगातील 8 उद्योगपतींकडे संपूर्ण विश्‍वाची 50 टक्के लोकसंख्येकडे असावी इतकी संपत्ती एकवटलेली आहे, असेही या सर्वेक्षणातून चव्हाट्यावर आलेले आहे.

गरिबांच्या संपत्तीत घट
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, देशात 58 असे श्रीमंत आहेत ज्यांकडे देशातील 70 टक्के लोकांकडे मिळून जितकी संपत्ती नसेल त्याहूनही अधिक संपत्ती आहे. तसेच देशातील 10 टक्के श्रीमंतांकडे 80 टक्के संपत्ती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. 1988 ते 2011 या काळात देशातील 10 टक्के गरिबांचे वार्षिक उत्पन्न हे फक्त 2 हजार रुपयांनी वाढले तर या तुलनेत देशातील श्रीमंतांच्या वार्षिक उत्पन्नांत मात्र 40 हजार रुपयांची वाढ होत आहे.

जगाची अर्धी संपत्ती 8 व्यक्तींकडे!
ऑक्सफेमने जगातील अर्ध्याधिक संपत्ती ही फक्त आठ व्यक्तींच्या हाती एकवटली आहे असेही म्हटले आहे. त्यात अमेरिकेतल्या 6 गर्भश्रीमंताचा आणि मेक्सिकोमधल्या एक आणि स्पेनमधल्या एका व्यवसायिकाचा समावेश असल्याचे म्हटले आहे. जगातील 50 टक्के गरिबांची संपत्ती एकत्र केली तर त्यापेक्षाही अधिक संपत्ती ही या आठ गर्भश्रींमतांकडे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यात बिल गेट्स, मार्क्स झकेरबर्ग आणि मायकल ब्लूमबर्ग व्यतिरिक्त आणखी पाच जणांचा समावेश आहे.

ठळक बाबी
मुकेश अंबानी : 19.30 अब्ज डॉलर
दिलीप सांघवी : 16.70 अब्ज डॉलर
अजिम प्रेमजी : 15 अब्ज डॉलर
देशाची एकूण संपत्ती : 3100 अब्ज डॉलर
84 उद्योगपतींकडे : 248 अब्ज डॉलर

जगातील श्रीमंत
बिल गेट : 75 अब्ज डॉलर
एमेनसियो आर्टेगा : 67 अब्ज डॉलर
वारेन बफेट : 60.80 अब्ज डॉलर
जगाची एकूण संपत्ती : 2.56 लाख अब्ज डॉलर
8 उद्योगपतींकडे : 6500 अब्ज डॉलर