नवी दिल्ली। दहशतवादी हल्ल्याची भीती त्याचबरोबर स्थानिकांकडून महिला पर्यटकांना मिळणारी वागणूक, त्यांच्यावर होणारे हल्लेे त्यात भारतातील पर्यटन स्थळांचा प्रचार करण्यासाठी परदेशात स्थापन करण्यात आलेली परराष्ट्र मंत्रालयाची कार्यालये ओस पडल्याने भारतात येणार्या परदेशी पर्यटकांची संख्या रोडवली आहे. याचा थेट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाल्यामुळे देशाला मिळणार्या परकीय गंगाजळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे नीती आयोगाने परराष्ट्र मंत्रालयाने सुरू केलेली ही कार्यालये बंद करण्याची शिफारस केली आहे. यासंबंधीचा एक अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.
या केंद्रातील अकुशल कर्मचार्यांच्या बेजबाबदार कारभाराचा परिणाम पर्यटन क्षेत्रावर होत आहे. अशी तक्रार आयोगाने केली आहे. पॅरिस, लंडन, मिलान, टोकियो अशा मोठ्या शहरांमध्ये ही केंद्र उभारण्यात आली आहेत. ती चालवण्यासाठी सरकारला करोडो रुपयांचा भार सहन करावा लागत आहे. पण त्यातून काहीच लाभ होत नसल्याने ती बंद करणेच योग्य असल्याचे नीती आयोगाचे म्हणणे आहे. जगातील ज्या राष्ट्रांमध्ये ही कार्यालय सुरू करण्यात आली तेथील नागरिक भारतात येण्यास फारसे उत्सुक नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.
काही वर्षांपूर्वी फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या युरोपीय देशातील पर्यटक मोठ्या संख्येने भारतात पर्यटनासाठी येत असत. पण आता त्यांची संख्या कमी झाली आहे. केंद्रातील पर्यटन मंत्रालयाने परदेशात तब्बल 14 पर्यटन कार्यालये सुरू केली आहेत. या कार्यालयातील कर्मचार्यांवर भारतातील पर्यटन स्थळांना प्रसिद्धी मिळवून देणे. लोकांना आपल्या देशातील पर्यटन स्थळांची माहिती उपलब्ध करून देणे अशी कामे सोपवण्यात आली आहेत. पण या विभागातील कर्मचारी अपेक्षित काम करत नसून सरकारला नाहक यांच्यावर करोडो रुपये खर्चावे लागत आहेत. असे आयोगाने म्हटले आहे.
फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँडच्या पर्यटकांची पाठ
सन 2013 ते 2015 दरम्यान फ्रान्स, जर्मनी, इटली, आणि नेदरलँड सारख्या संपन्न देशातून हिंदुस्थानात येणार्या पर्यटकांची संख्या वाढण्याऐवजी कमी झाली, तर याच वर्षात आस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, यूनान, स्वित्झरलँड आणि स्वीडनहून येणार्या पर्यटकांची संख्याही घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आखाती देशातील पर्यटकही कमी झाले आहेत. दरम्यान परदेशी महिला पर्यटकाची छेडछाड, बलात्कार, लुटमार यांसारख्या घटनाही देशात मधल्या काळात घडल्या. यामुळे महिला पर्यटकांना हिंदुस्थानमध्ये जाणे असुरक्षित वाटत आहे. हेदेखील पर्यटक संख्या रोडावण्याचे मुख्य कारण आहे.