जमैका। कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर आठ गडी राखून मात केली. त्याचबरोबर भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर 3-1 ने कब्जा केला. पाचव्या आणि निर्णायक सामन्यात मोहम्मद शमी आणि उमेश यादवने भेदक मारा करत यजमान संघाला अवघ्या 205 धावांत रोखल्यानंतर विराट कोहलीने शानदार शतकी खेळी करताना अजिंक्य रहाणे आणि दिनेश कार्तिकच्या साथीने जबरदस्त भागीदार्या रचत भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 8 विकेट्स राखून पराभव केला. पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने एकदिवसीय मालिका 3-1 अशी खिशात घातली. भारतीय संघ 206 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. विराट कोहलीने खणखणीत शतक ठोकत 111 धावांची नाबाद खेळी केली. 115 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि दोन षटकांराने त्याने आपली खेळी सजवली. तर दिनेश कार्तिकनेही 52 चेंडूमध्ये चार चौकारांच्या मदतीने 50 धावांवर नाबाद राहिला. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणार्या वेस्ट इंडिजला निर्धारित 50 षटकात केवळ 205 धावाच करता आल्या. मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजला 4 झटके दिले. तर उमेश यादवनेही 3 विकेट्स मिळवत वेस्ट इंडिजच्या धावसंख्येला लगाम घातला.
हा विक्रम अजूनही सचिनचाच
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही सचिनच्याच नावावर आहे. एकदिवसीय सामन्यातील दुसर्या डावात फलंदाजी करताना सचिनने 232 डावांमध्ये 8720 धावा केल्या आहेत. या यादीत विराटने केवळ 102 डावांमध्ये 5169 धावा करत सातवे स्थान मिळवले आहे. या यादीत 210 सामन्यांमध्ये 5742 धावा करणारा जयसूर्या दुसर्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भविष्यात कोहली या स्थानावर असणार हे निश्चित आहे.
भारताला विंडीजमध्ये सलग तिसरी मालिका जिंकून देताना विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडला. गुरुवारी झालेल्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना कोहलीने 18 वे शतक पूर्ण केले. धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक 17 शतके करण्याचा भारतीय विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिनने 17 शतकांसाठी 232 डाव खेळले होते. कोहलीने केवळ 102 डावांमध्ये 18 शतकांचा विक्रम रचला. विशेष म्हणजे कोहलीच्या या 18 शतकांपैकी 16 शतकांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत.
भारताने ही मालिका जिंकून कॅरेबियन बेटांवर मालिका विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2009 मध्ये चार एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती.
2011 मध्ये सुरेश रैना कर्णधारपदावर असताना भारताने 3-2 अशा फरकाने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये बाजी मारली होती. आता विराट कोहलीने विजयाची मालिका कायम राखली.
दोन्ही संघामध्ये विंडीजमध्ये आठ मालिका झाल्या. चार यजमानांनी आणि चार भारताने जिंकल्या आहेत. भारतासाठी गांगुली (2002), धोनी (2009), रैना (2011) आणि कोहलीने (2017) मालिका जिंकल्या आहेत.
सहा महिन्यांनंतर कोहलीचे शतक
कोहलीने तब्बल सहा महिने आणि 11 एकदिवसीय सामन्यांनंतर कारकिर्दीतले 28 वे शतक झळकवले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमधील शतकांच्या क्रमवारीत तो संयुक्तरित्या तिसर्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर (49) आणि रिकी पॉन्टिंग (30) या यादीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्या स्थानावर आहेत. 28 वे शतक करण्यासाठी कोहलीला 181 सामने खेळावे लागले. तर त्याच्यासोबत संयुक्तरित्या तिसर्या क्रमांकावर असणार्या श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला तेवढी शतके करण्यासाठी तब्बल 433 सामने खेळावे लागले.