श्रीनगर। वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानी सैन्याला गुरवारी पुन्हा एकदा भारतीय सैन्याने चांगलाच दणका दिला. भीमबेर आणि बट्टल सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देणार्या भारतीय सैन्याच्या गोळीबारात पाकचे पाच जवान ठार झालेत, तर सहा जण जखमी झाले आहेत. भारताच्या या कारवाईमुळे हादरलेल्या पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त जे.पी.सिंग यांच्याशी संपर्क साधला.
राजौरी आणि पुंछ जिल्ह्यात नियंत्रणं रेषेवर असणार्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने गुरुवारी मोर्टारने हल्ला करत, गोळीबारी करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. या हल्ल्यात जनरल इंजिनीअरिंग रिझर्व्ह फोर्सचा एक कर्मचारी मारला गेला, तर दोघेजण जखमी झाले होते. जखमींमध्ये बीएसएफचा एक जवानही सामील होता. यानंतर भारतीय जवानांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान जम्मू काश्मीरमधील सोपोर येथील नाथी पोरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली आहे. बुधवारी (31 मे) सोपोरमध्ये पोलीस दलावर ग्रेनेड फेकण्यात आले होते. या भ्याड हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले होते. पेट्रोलिंग करत असताना पोलिसांवर हल्ला करण्यात आला. बुधवारी दुपारी 4.10 वाजण्याच्या सुमारास सोपोर येथे एका बँकेजवळ तैनात पोलिसांच्या गटावर ग्रेनेड फेकण्यात आल्याने चार पोलीस जखमी झाल्याचे एका अधिकार्याने सांगितले. यानंतर जखमी पोलिसांना तातडीनं उपचारांसाठी जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.