नवी दिल्ली-कोलकाताविरुद्ध काल झालेल्या बाद फेरीतील सामन्यात रशीद खानने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात आपली कमाल दाखवली. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांसह १० चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. तसेच १९ धावांत ३ गडी बाद केले. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीने चाहत्यांना तर प्रभावित केलेच. पण अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनीही त्याचे तोंडभरून कौतुक केले. घनी यांनी ट्विट करून रशिदची प्रशंसा केली. ‘रशीद हा आमचा हिरो आहे. सर्व देशवासीयांना त्याचा अभिमान आहे. त्याला एवढ्या मोठ्या व्यासपीठावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल आमच्या भारतीय मित्रांचे आभार!, असे घनी यांनी ट्विट केले आहे.
Afghans take absolute pride in our hero, Rashid Khan. I am also thankful to our Indian friends for giving our players a platform to show their skills. Rashid reminds us whats best about Afg. He remains an asset to the cricketing world. No we are not giving him away. @narendramodi
— Ashraf Ghani (@ashrafghani) May 25, 2018
याच ट्विटमध्ये ते पुढे म्हणाले आहेत की अफगाणिस्तान कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे, हे रशीदने आम्हाला पुन्हा दाखवून दिले. तो क्रिकेट जगतात नक्कीच मोलाचे योगदान देईल, याची मला खात्री आहे. मात्र, भारताचे पंतप्रधान मोदी यांना मी सांगू इच्छितो की आम्ही आमचा रशीद तुम्हाला देणार नाही. दरम्यान, पंतप्रधान यांनी यावर अद्याप उत्तर दिलेले नाही. रशीद खानने यंदाच्या आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. सर्वाधिक बळी टिपणाऱ्यांच्या यादीत रशीद २१ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंतिम सामन्यात ४ गडी टिपून पहिल्या क्रमांकावर जाण्याची त्याच्याकडे सुवर्णसंधी आहे.