भारताला चिलीसोबतचा विजय अनिवाय

0

जोहान्सबर्ग । भारतीय संघाला जागतिक महिला हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्यातील ब गटातील दुसर्‍या लढतीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. अमेरिकेने 4-1 अशा फरकाने विजय मिळवताना भारताच्या बचावफळीचे कच्चे दुवे समोर आणले. लिलिमा मिंझने भारतासाठी एकमेव गोल केला. या पराभवामुळे भारताची गटात चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तसेच स्पर्धेत पुढे जाण्यासाठी त्यांना आता उर्वरित दोन सामन्यांत विजय मिळवणे अनिवार्य असेल.

सामन्याच्या 24व्या मिनिटाला जिल विटमेरने अप्रतिम मैदानी गोल करताना अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत अमेरिकेने सामन्यावर पकड घेतली, परंतु तिसर्‍या सत्रात लिलिमाने गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत आणला. मात्र, पुढील नऊ मिनिटांत अमेरिकेने आक्रमणाचा जोर वाढवत भारतीय खेळाडूंना पराभवास भाग पाडले. वेस्ट टेलर, विटमेर आणि व्हिटेस मिचेल यांनी गोल करत अमेरिकेची आघाडी 4-1 अशी भक्कम केली. ब गटातील दुसर्‍या लढतीत अर्जेटिनाने 2-0 अशा फरकाने चिलीवर मात केली. उद्या (बुधवारी) भारताचा सामना गटात तळाशी असलेल्या चिलीशी होणार आहे.