मोहाली । विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यांत विजय आवश्यक आहेत. तीन एकदिवसीय सामन्यांच्या या मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला कोणत्याही स्थितीत श्रीलंकेला पराभूत करण्याची गरज आहे. मोहाली येथे बुधवारी होणार्या दुसर्या एकदिवसीय सामन्याला सामोरे जाताना अजिंक्य रहाणेचा फॉर्म हीच प्रमुख समस्या भारतापुढे आहे. याचप्रमाणे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधवला दुखापतीमुळे संपूर्ण एकदिवसीय मालिकेला मुकावे लागणार आहे. कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित, रहाणे, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी यांच्यावर भारताच्या फलंदाजीची मदार असेल. रोहित आणि धवन भारताच्या डावाला प्रारंभ करतील, तर तिसर्या स्थानावर रहाणे फलंदाजीला उतरण्याची दाट शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील लक्षवेधी कामगिरीनंतर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रहाणेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने पदार्पण केले. याशिवाय खराब कामगिरीनंतर मनीष पांडेलाही पाचव्या क्रमांकावर पसंती देण्यात आली. त्यामुळे भारतीय संघाच्या निवडीवर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे संघातील बदल अपेक्षित आहे.
भारताचे फलंदाज कागदावरीलच घोडे
धर्मशाळामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहलीच्या गैरहजेरीत भारताचे फलंदाज कागदावरीलच घोडे ठरले होते. धवन, रोहित, श्रेयस, कार्तिक यांना चेंडूंची दिशाच समजली नाही. अन्य फलंदाज नवखे होते; पण यानंतरही वेगवान गोलंदाजीला साथ देणार्या खेळपट्टी म्हणा किंवा हवामानात भारतीय फलंदाजीच्या उणिवा प्रकर्षाने समोर आल्या. कार्तिकसोबतच सलामीवीर शिखर धवनही शून्यावर बाद झाला, तर रोहित शर्मा, मनीष पांडे, श्रेयस अय्यर यांना दोन अंकी धावसंख्येचा आकडादेखील पार करता आला नाही. केवळ हार्दिक पंड्याने धोनीपाठोपाठ सर्वोच्च दहा धावांचा टप्पा गाठला होता.
महेंद्रसिंग धोनीकडून पुन्हा अपेक्षा
भारताचा निम्मा डाव 16 धावांत संपुष्टात आला होता. अर्धशतकाच्या आतच भारताचा डाव आटोपणार अशीच (7 बाद 28) एकवेळ परिस्थिती होती. अशा वेळी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एकाबाजूने जिगरबाज खेळी करून भारतीय डावाची लाज राखल्यामुळेच भारतीय संघाला किमान शंभरी गाठता आली. भारताच्या डावातील निम्म्याहून अधिक धावा धोनीच्या एकट्याच्या होत्या. धोनीने 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली होती. त्यामुळे मोहालीमध्ये होणार्या दुसर्या एकदिवसीय सामन्यांत धोनीकडून पुन्हा एकदा चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.
अष्टपैलू हार्दिक पंड्यावर प्रमुख भिस्त
अष्टपैलू हार्दिक पंड्यावर भारताची प्रमुख भिस्त असेल. लेग-ब्रेक गोलंदाज युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि फलंदाजांना जखडून ठेवणारा अक्षर पटेल यांच्यावर भारताच्या फिरकीची धुरा असेल. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार वेगवान मारा सांभाळतील. वेगवान गोलंदाज म्हणून सिद्धार्थ कौलला रोहित संधी देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
अजिंक्य रहाणेला खेळवणे अत्यावश्यक
श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील सलामीच्या सामन्यात धर्मशालेच्या मैदानात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी पत्त्यांच्या पानाच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आघाडीच्या फलंदाजीच्या अपयशानंतर अजिंक्य रहाणे संघात असायला हवा होता, या चर्चेला उधाण आले. मुंबईचा शैलीदार फलंदाज रहाणेने जून-जुलै महिन्यात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले होते. याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत चार सलग अर्धशतके त्याने नोंदवली आहेत. मर्यादित षटकांच्या सामन्यात अजिंक्य रहाणे सलामीचा उत्तम पर्याय आहे. सध्याच्या घडीला त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देणे कठीण होते, असे कर्णधार रोहित शर्माचे मत आहे. मात्र फलंदाजी भक्कम करण्यासाठी अजिंक्य रहाणे मोहालीत होणार्या सामन्यात खेळण्याची गरज आहे.