भारतीय अर्थव्यवस्था पंचर टायर प्रमाणे-चिदंबरम

0

मुंबई-भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती तीन टायर पंक्चर असलेल्या कारसारखी झाली आहे अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली. इंधन दरवाढीवरुन चिदंबरम यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. ठाण्यातील डॉ.काशीनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ‘फूट पाडणारे राजकारण आणि मंदावलेली अर्थव्यवस्था’ या विषयावर चिदंबरम बोलत होते.

खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, जनतेची खर्च करण्याची क्षमता, निर्यात आणि सरकारकडून विविध सेवांवर होणारा खर्च या चार गोष्टी म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची चार चाकं आहेत. यामधील एक चाक जरी पंक्चर झालं तरी अर्थव्यवस्था मंदावते, पण आपल्याकडे तर तिन्ही टायर पंक्चर आहेत असे चिदंबरम म्हणाले.

भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर केलेल्या चुका एकवेळ सुधारता येतील. पण भाजपाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे निर्माण झालेला सामाजिक घोळ निस्तरता येणे अवघड आहे. भाजपाच्या निर्णयांमुळे समाजातील काही घटकांपर्यंत चुकीचा संदेश गेला आहे. या लोकांना अचानकपणे आपण दुय्यम दर्जाचे नागरिक आहोत, असे वाटायला लागले आहे. याशिवाय, भाजपा सरकारच्या काळात खानपानाच्या पद्धती आणि सामाजिक वर्तनावरूनही अनेक वाद निर्माण झाल्याचे पी. चिदंबरम यांनी सांगितले.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतंर्गत लघुद्योगांना 10 लाखांपर्यंत अनुदान दिले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत या योजनेतंर्गत वितरीत करण्यात आलेली सरासरी रक्कम 43 हजार इतकीच आहे. इतक्या कमी पैशात कोणत्याही उद्योजकाला भरीव गुंतवणूक करता येणे शक्य नाही. त्यामुळे एवढ्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच सुरू करता येणे शक्य आहे, असा टोलाही पी. चिदंबरम यांनी मोदींना लगावला.