नवी दिल्ली । भारतीय क्रिकेटपटूंना येत्या काही दिवसांत मोठी खूशखबर मिळणार आहे. भारतीय संघातील आणि स्थानिक क्रिकेटपटूंच्या वेतनात दुप्पट वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती वेतनवाढीसंदर्भातील नवीन फॉर्म्युलावर काम करत आहे. त्यानंतर खेळाडूंच्या वेतनात 100 टक्के वाढ होईल, असे सांगितले जाते. वरिष्ठ आणि कनिष्ठ संघांतील खेळाडूंना त्यांचा योग्य वाटा मिळावा, यासाठी प्रशासकीय समिती प्रयत्नशील आहे, असे समितीशी संबंधित सूत्रांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले.
ही समिती वेतनवाढीबाबतचा अहवाल बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेपुढे सादर करणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंची पगारवाढ करावी, अशी मागणी केली होती. आता पुढील सत्रापासून क्रिकेटपटूंना वेतनवाढीचा लाभ मिळेल, असे सांगण्यात येत आहे. नवीन फॉर्म्युला लागू झाल्यानंतर विराटसारख्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंना बीसीसीआयकडून वर्षभरात 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. तर वर्षाला 12 ते 15 लाख रुपये वेतन घेणार्या रणजी संघातील काही क्रिकेटपटूंना 30 लाख रुपये वेतन मिळू शकते.