भारतीय खेळाडुंनी पदकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज

0

गोल्ड कोस्ट । निवासस्थानाजवळ सापडलेल्या इंजेक्शनच्या सिरिंजमुळे निर्माण झालेल्या वादाचा भारतीय खेळांडुवर काही प्रमाणात परिणाम झाला आहेच. तरीही एकाहून एक सरस दर्जाच्या खेळाडूंचा समावेश असलेल्या भल्यामोठ्या भारतीय पथकाकडून देशवासीयांना असलेल्या पदकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना बुधवारपासून शानदार कार्यक्रमांनी सुरु झालेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या ध्येयावरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आतापर्यंतच्या 20 राष्ट्रकुल स्पर्धांच्या तुलनेत खूपच कमी झगमगाट असलेल्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा बुधवारी पार पडला. या उद्घाटन सोहळ्यात आघाडीची बॅडमिंनटपटू पी.व्ही. सिंधुने तिरंगा हाती धरत भारतीय पथकाचे नेतृत्व केले.

नितांतसुंदर समुद्रकिनारा लाभलेल्या आणि सर्फिंगप्रेमींचा स्वर्ग असलेल्या गोल्ड कोस्ट शहराला एरवीही पर्यटकांचा वेढा असतो. परंतु ऑलिम्पिकनंतर दुसर्‍या क्रमांकाची क्रीडास्पर्धा सुरू होत असूनही शहरवासीयांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या मंत्री केट जोन्स यांनी सातत्याने आवाहन करूनही विविध क्रीडाप्रकारांची हजारो तिकिटे अद्याप विकली गेलेली नाहीत. बाहेर पडा आणि आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धेची तिकिटे खरेदी करा, असे आवाहन संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क पीटर्स यांनीही केले आहे. तरीही तिकीटविक्रीचा वेग वाढलेला दिसत नसल्याने संयोजन समितीला चिंता वाटते आहे. आतापर्यंत केवळ 12 लाख तिकिटे विकली गेली असली, तरी लवकरच वेग वाढेल आणि किमान 95 टक्के तिकिटे विकली जातील, असा दावा पीटर्स यांनी केला आहे.एकेकाळच्या ब्रिटिश साम्राज्याचा घटक असलेल्या 71 देशांचा सहभाग असलेली राष्ट्रकुल स्पर्धा नेहमीच टीकाकारांचे लक्ष्य ठरली आहे. इंग्लंडच्या निर्दय साम्राज्यवादाचे प्रतीक असलेल्या राष्ट्रकुलाच्या सदस्यांसाठीच असलेल्या या स्पर्धेमुळे गुलामगिरीच्या कटू आठवणींनाच उजाळा मिळत असल्याचीही टीका होते. तरीही स्पर्धेचा उच्च दर्जा, पदकांची भलीमोठी संख्या आणि पदकविजेत्या खेळाडुंना मिळणारी प्रतिष्ठा व पैसा यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंचा सहभाग आणि प्रेक्षकांचा प्रतिसादही वाढता राहिला आहे.