नवी दिल्ली । भारतीय महिला खेळाडूंकडे अव्वल कामगिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्याला अथक परिश्रम आवश्यक आहेत. भारतीय महिला संघाने जागतिक हॉकी लीगमधील दुसर्या टप्प्यात विजेतेपद मिळवले असले तरी जागतिक स्तरावर सर्वोच्च यश मिळवण्यासाठी त्यांनी आत्मविश्वास वाढविला पाहिजे, असे भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक मेरिजीन सिजोर्ड यांनी सांगितले. यावेळी त्यांनी संघाचे भरभरून कौतुक देखील केले. ते म्हणाले की, खेळाडूंना सतत खेळाच्या सरावात किंवा सामन्यांमध्ये गुंतवत ठेवले तर त्या जास्त विचार करीत बसणार नाही, असे माझे मत आहे व त्या दृष्टीनेच मी नियोजन करणार आहे. त्या 24 तास फक्त खेळाचाच विचार करतील असा माझा प्रयत्न राहणार आहे.
दोनच महिन्यांपूर्वी स्वीकारली सूत्रे
टोकियो येथे 2020 मध्ये होणार्या ऑलिम्पिकपर्यंत त्यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहणार आहे. भारतास दुसर्या टप्प्यातील प्रथम क्रमांकामुळे उपांत्य फेरी लीगसाठी प्रवेश मिळाला आहे. ही लीग विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरी असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिजोर्ड यांनी दोनच महिन्यांपूर्वी प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली व ते जागतिक हॉकी लीगमधील दुसर्या टप्प्याच्या पहिल्याच परीक्षेत यशस्वी झाले आहेत. सिजोर्ड म्हणाले, भारतीय खेळाडूंकडे अव्वल कामगिरी करण्याची क्षमता आहे. मात्र त्यांचा स्वत:च्या कामगिरीवर व क्षमतेवर विश्वास नाही. त्यामुळेच काही वेळा मैदानावर उतरण्यापूर्वीच त्यांच्या मनात आपण सामना गमावल्याची भावना निर्माण झालेली असते. प्रतिस्पर्धी संघापेक्षा आपण कमकुवत असल्याच्या मनोवृत्तीनेच या खेळाडू खेळत असतात असे ते म्हणाले. देशांतर्गत खेळापेक्षा जागतिक स्तरावर सर्वोच्च यश मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास वाढविला पाहिजे, असे ते म्हणाले.