भारतीय फुटबॉल संघाने तब्बल दोन दशकानंतर घेतली झेप

0

नवी दिल्ली । सर्वच क्रीडा प्रकारात चमकत असताना आता फुटबॉलला देखील अच्छे दिन येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. भारतीय फुटबॉल संघाने तब्बल दोन दशकानंतर पुन्हा एकदा 101 व्या स्थानी गुरुवारी झेप घेतली. नव्याने जाहीर मानांकन यादीत गत आठवडयाच्या तुलनेत भारताचे मानांकन 31 अंकांनी सुधारले आहे. याशिवाय, आशिया मानांकन यादीत देखील भारत 11 व्या स्थानी पोहोचला आहे. यामुळे निश्चितच भारतीय फुटबॉलची कामगिरी सरस होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सर्वोच्च मानांकन 94 : फिफा मानांकन यादीत भारताने प्राप्त केलेले आजवरचे सर्वोच्च मानांकन 94 इतके राहिले आहे. फेब्रुवारी 1996 मध्ये त्यांनी या मानांकनापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर भारतीय संघ ऑक्टोबर 1993 मध्ये 99 व्या स्थानी तसेच ऑक्टोबर 1999, डिसेंबर 1993 व एप्रिल 1996 मध्ये 100 व्या स्थानी विराजमान होता. मागील दोन-एक वर्षाच्या कालावधीत भारतीय फुटबॉल संघाने उत्तम यश प्राप्त केले असून त्यांनी तब्बल 13 पैकी 11 सामने जिंकले आहेत. यामध्ये भूतानविरुद्ध खेळवल्या गेलेल्या अनधिकृत लढतीचाही समावेश आहे. भारताने या सर्व लढतीत एकंदरीत 31 गोल नोंदवले.

वाटचाल योग्य दिशेने
अलीकडेच संघाने एएफसी आशियाई चषक पात्रता लढतीत म्यानमारचा 1-0 फरकाने पराभव केला. 64 वर्षांच्या कालावधीत भारताने म्यानमारविरुद्ध विजय संपादन करण्याचा हा एकमेव प्रसंग ठरला. यापूर्वी, मैत्रीपूर्ण लढतीत कंबोडियाविरुद्ध मिळवलेला 3-2 फरकाचा विजय देखील लक्षवेधी ठरला. गतवर्षी भारताने प्युएर्तो रिकोचा तब्बल 4-1 असा जोरदार धुव्वा उडवला होता, तो ही ऐतिहासिक विजय ठरला. दरम्यान, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेन्टाईन यांनी या पराक्रमाबद्दल संघाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ‘आतापर्यंतचा संघाचा प्रवास खूपच खडतर होता आणि एकंदरीत वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल पटेल व सचिव कुशल दास यांनी मला माझ्या प्रशिक्षणात स्वातंत्र्य दिले. म्हणूनच या बाबी साध्य करणे शक्य झाले.

कॉन्स्टेन्टाइन यांचा करिष्मा
संघाच्या चांगल्या कामगिरीच्या मागे कॉन्स्टेन्टाइन यांचा करिष्मा असल्याचे मानले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कॉन्स्टेन्टाइन प्रशिक्षकपदी रुजू झाले, त्यावेळी भारतीय संघ तब्बल 171 व्या स्थानी फेकला गेला होता. पुढे नेपाळविरुद्ध भारताने 2-0 असा विजय मिळवला व त्यानंतर काही अपवाद वगळता संघाने सातत्याने यश प्राप्त केले आहे. आता दि. 7 जून रोजी भारत मायदेशात लेबनॉनविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैत्रीपूर्ण लढत खेळणार असून त्यानंतर दि. 13 जून रोजी एएफसी आशियाई पात्रता सामन्यात किर्गीज प्रजासत्ताकविरुद्ध मुकाबला करणार आहे.