नवी दिल्ली-आयर्लंडच्या संघासोबत सुरु असलेल्या भारतीय हॉकी संघाची पहिल्या सामन्यात विजयाची संधी हुकली. दुसरा सामना आज गुरुवारी आयर्लंडच्या संघाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी ६. ३० वाजता सुरु होणार आहे. हॉकीच्या जागतिक क्रमवारीत आयर्लंडचा संघ भारतापेक्षा खालच्या स्थानावर असला तरी त्यांच्या संघाला गवसलेला सूर पाहता चांगला आहे.
जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या इंग्लंडच्या संघाला पराभूत करण्याची संधी भारताने पहिल्याच सामन्यात गमावली. उत्तरार्धापर्यंत १-० अशी आघाडी असूनदेखील भारतीय संघाने अखेरच्या टप्प्यात ही आघाडी गमावली. त्यामुळे भारताला पहिल्या साामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. गुरुवारी ‘ब’ गटामध्ये जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा संघ आणि सोळाव्या स्थानावर असलेला आयर्लंडचा संघ असा हा सामना होणार आहे.
आयर्लंड संघाने जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेवर ३-१ असा विजय मिळवला होता. मात्र, या गटातील सगळ्यात खालच्या क्रमवारीचा संघ असूनही प्रत्येकी एक सामन्यानंतर आयर्लंडचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे गुरुवारचा भारताविरुद्धचा सामना जिंकून बाद फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आयर्लंडचा संघ करणार आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार आहे. मात्र, गतवर्षी हॉकी विश्व लीगमध्ये याच आयर्लंडच्या संघाकडून भारतीय संघाला २-१ असा पराभव पत्करावा लागला होता.