पाकने शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये भारतीय राजनैतिक अधिकार्यांना त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे. आता भारतीय राजनैतिक अधिकार्यांना शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी याप्रकरणी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वीही भारतीय राजनैतिक अधिकार्यांना पाकिस्तानमधील एका क्लबमध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता.
भेटही एक सामान्य प्रक्रिया
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय राजनैतिक अधिकार्यांना भारतातून येणार्या शीख भाविकांबरोबर तीर्थस्थळी जाणे आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याची सूट असते, ही एक सामान्य प्रक्रिया आहे. काऊन्सलर आणि राजशिष्टाचाराशी निगडीत जबाबदारी पाहता भारतीय दुतावासाच्या अधिकार्यांना ही सूट दिली जाते. वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी किंवा कठीण परिस्थिती उद्भवल्यास एकमेकांना मदत करण्याचा यामागचा उद्देश असतो.
भारत सरकारने आक्षेप नोंदवला
भारतातून सुमारे 1800 शीख भाविक गुरूवारी पाकिस्तानला गेले होते. बैसाखी उत्सव साजरा करण्यासाठी हे रावळपिंडीच्या गुरूद्वारा पंजा साहिबला गेले होते. त्यावेळी भारतीय अधिकार्यांना पाकिस्तानमध्ये शीख भाविकांना भेटण्यापासून रोखले होते आणि त्यांना राजशिष्टाचाराची अंमलबजावणीही करू दिली नव्हती. यावरून भारत सरकारने आपला आक्षेप नोंदवला होता.