भारतीय रेल्वे डब्यांचे रुपडे पालटणार

0

नवी दिल्ली । भारतात रेल्वे प्रवास म्हटला, की अनेकांच्या कपाळावर आठ्या पडतात. याचे कारणही तसेच आहे. वाढते रेल्वे अपघात आणि डब्यांची दुरवस्था पाहिल्यास रेल्वेचा प्रवास म्हणजे जीवाला त्रास अशी प्रतिक्रिया अनेक जण देतात. चिंताजनक बाब म्हणजे रेल्वेचे 85 टक्के डबे असुरक्षित आहेत. परंतु, हे चित्र बदलण्याचा निर्धार रेल्वेने केला आहे. भारतीय रेल्वेकडून लवकरच फक्त डब्यांवरच तब्बल 15000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. सुमारे 40 हजार अद्ययावत डबे पुढील काही वर्षांमध्ये रुळांवर धावताना दिसणार आहेत.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे रेल्वेसेवा, रेल्वेस्थानकांचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता रेल्वेच्या डब्यांचे रुपडे बदलण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की सध्या वापरात असलेल्या डब्यांची निर्मिती एप्रिल 2018 पासून बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी नवे एलएचबी डबे तयार करण्यात येतील. जर्मनीच्या अ‍ॅल्स्टॉम या कंपनीने या डब्यांची रचना केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे सध्या वापरात असलेल्या रेल्वेच्या 63 हजार डब्यांपैकी तब्बल 53 हजार डबे असुरक्षित आहेत. या डब्यांमध्ये अँटी-क्लाइंबिंग तंत्रज्ञानाचा अभाव आहे. त्यामुळे डबे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या 40 हजार डब्यांपैकी 40 टक्के डब्यांची निर्मिती खासगी गुंतवणुकीतून करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे मंडळाचे सदस्य रवींद्र गुप्ता यांनी दिली.

अंधांसाठी ब्रेल लिपीत सूचना
भारतात सध्या फक्त 6000 एलएचबी डबे आहेत. त्यांचा वापर राजधानी आणि शताब्दी एक्स्प्रेसमध्ये होत आहे. इतर 6000 गाड्यांमध्ये आयसीएफ डबे आहेत. दरवर्षी सरासरी 3500 एलसीएफ डबे तयार करण्यात येणार आहेत. नव्या डब्यांमध्ये विशिष्ट प्रकारचे कपलिंग असेल. त्यामुळे नवे डबे जास्त सुरक्षित राहणार आहेत. तसेच मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी अधिक पॉईंट्स दिले जाणार आहेत. यासोबत अंध व्यक्तींसाठी ब्रेलमध्ये सूचना फलक लावले जाणार आहेत. या नविन डब्यांमुळे रेल्वे अपघातात प्रवाशांना पहिल्यापेक्षा जास्त संरक्षण मिळेल.