भारतीय संस्कृती ही नित्य नूतन

0

पुणे । जागतिक व्यासपीठांवर विविध संस्कृतींचा आढावा घेतला असता भारतीय संस्कृतीपेक्षा जुन्या संस्कृती होत्या. तसेच संस्कृतीच्या उच्च शिखरावर देखील काही संस्कृती होत्या. पंरतू त्या सर्व संस्कृती आता नामशेष झाल्या असून आज संपुर्ण जगाचे लक्ष केवळ भारतीय संस्कृतीवर केंद्रीत झाले आहे. कारण सर्व आक्रमण, विद्रोह पचवून भारतीय संस्कृतीत असलेली नित्य नूतनतेमुळेच भारतीय संस्कृती आज नेतृत्वास सज्ज झाली असल्याचे मत ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले.

प्रसाद प्रकाशनातर्फे कै. मनोहर तथा बापूसाहेब जोशी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कै. मनोहर तथा बापूसाहेब जोशी स्मृतिगौरव पुरस्कार भागवताचार्य वा. ना. उत्पात यांना तर लेखिका मंजिरी जोशी यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कै. मंजिरी मनोहर जोशी स्मृतिगौरव पुरस्कार भारताचार्य सु. ग. शेवडे यांना ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यावेळी डॉ. देगलुरकर बोलत होते. वसंतराव गाडगीळ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, प्रसाद प्रकाशन आणि डॉ. उमा बोडस आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

प्रसाद प्रकाशनातर्फे प्राचीन व्यवस्थापनशास्त्र, नैषधीयचरितम्, अष्टावक्र गीता, हरिपाठ-एक आनंदवारी, अमृतवर्षिणी, व्दापारयुग, षोडशोपनिषद् संग्रह (मराठी अर्थासहित), पतंजली सूत्र आणि विज्ञान, मानवी स्वभावाचे त्रिगुणात्मक विश्‍लेषण, तैत्तिरीय उपनिषदातील जीवनमूल्ये या पुस्तकांचे तर अनाहत प्रकाशनातर्फे कुंचला, तव चरणावरी, पुनर्संघटन करा स्वतःचे बारा आठवड्यात आणि मनस्पर्शी या पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

संतांनी वैश्‍विक विचार मांडला
भारतीय संस्कृती ही वैश्‍विक संस्कृती आहे. भारतीय संतांनी कधीच भारतापुरता विचार न करता त्यांनी वैश्‍विक विचार मांडला आहे, आणि तो ही केवळ मनुष्य जाती पुरता नव्हे तर चराचराचा त्याच विचार केला गेला आहे, असे डॉ. विजय भटकर यांनी सांगितले. डॉ. उमा बोडस यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.