इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे सहा दिवशीय भारत दौर्यावर आले आहेत. त्यांच्या या दौर्यातून ऐतिहासिक मैत्रिपर्व लाभलेले भारत-इस्त्राईल संबंध आणखीच दृढ झालेत. दोन देशांदरम्यान झालेले करार पाहाता, या मैत्रीने नवीन अध्याय लिहिला, असेच म्हणावे लागेल. भारताच्या भूमिला चीन आणि पाकिस्तानसारखे शत्रू लाभलेले आहेत. तर इस्त्राईल चोहूबाजूने शत्रूने घेरलेला आहे. त्यामुळे या शत्रूला मात देण्यासाठी त्यांनी जे लष्करी तंत्रज्ञान शोधले ते अभूतपूर्व असेच आहे. अन् हेच तंत्रज्ञान नेतन्याहू भारताला देण्यास तयार झालेत. त्यामुळे या छोट्याशा दोस्ताचे भारताला लाभलेले सहाय्य हे अतिशय मोलाचे ठरणारे आहे. हा दौरा ऐतिहासिकच म्हणावा लागेल. कारण, या भेटीतून नवीन इतिहास घडणार आहे.
खरे तर स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील त्या ऐतिहासिक भाषणानंतर भारत आणि ज्यू निर्वासितांच्या मैत्रीचा अध्याय जगासमोर उघड झाला होता. विविध संस्कृती, आणि शरणागतांना भारताने मायेच्या आपुलकीने नेहमीच आधार दिला. जगाच्या पाठीवर हा एकमेव असा देश आहे, ज्यांनी प्रत्येक दुःखी, कष्टी आणि पीडितांना आपल्या हृदयाशी कवटाळले. या उपकाराची जाणिव नेहमीच यहुदी-ज्यू यांनी ठेवली. परंतु, स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय धोरणे आखताना आपण भारताचा हा विश्वधर्मच विसरलो होतो. राजकीय समिकरणे जुळविताना आपण या जवळच्या मित्राकडे काहीसे दुर्लक्षच केले होते. परंतु, जेव्हा जेव्हा भारत संकटात सापडला तेव्हा तेव्हा अगदी अलिकडे उदयाला आलेले हे छोटेसे राष्ट्र आपल्या मदतीला धावले, हा इतिहास दुर्लक्षून चालणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राष्ट्राशी मैत्रिपर्वाचा नवा अध्याय लिहिण्यास घेतला आहे. या मैत्रीला इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी तर कळसच दाखविला. त्यांची ही भारतभेट नक्कीच इतिहास घडवेल, याबद्दल कुणाला शंका असण्याचे अजिबात कारण नाही. व्यापारउदिमासह अनेक महत्वपूर्ण करार पंतप्रधान नरेंद्र मोदी व नेतन्याहू यांच्यात झाले.
अनेक राष्ट्रांशी आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखांशी असे करार-मदार होतच असतात. तो आंतरराष्ट्रीय रहाटगाडग्याचा एक भागच असतो. परंतु, उल्लेखनीय बाब ठरली ती या राष्ट्राने भारतासोबत केलेल्या संरक्षण सिद्धतेतील कराराची होय! मोदी-नेतन्याहू यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत एक ठळक बाब अशी घडली की, भारताच्या सुरक्षेला मजबूत करण्यासाठी या दोन्ही नेत्यांनी ठोस पाऊले उचलली. केवळ मोदीच नव्हे तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही इस्त्राईलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेर शेनशा यांच्याशी गोपनीय अशी प्रदीर्घ चर्चा करून भारताच्या लष्करी सिद्धतेला इस्त्राईलच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कसा हातभार लागेल, याचा विचार केला अन् या राष्ट्राकडून पदरात काही बाबीही पाडून घेतल्या. अर्थात, या चर्चेच्या तपशीलावर जाहीर चर्चा करायची नसते. या चर्चेतून जे काही पदरी पडेल ते राष्ट्रहिताचे आणि शेजारी असलेल्या शत्रूराष्ट्रांना पुरून उरणारेच ठरणार आहे. फार काही विस्ताराने नमूद करता येणारे नसले तरी, इस्त्राईल भारताला रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र स्पाईक देण्यास तयार झाले आहे. त्यामुळे शत्रूने भारतीय रणगाड्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा हा प्रयत्न उधळून लावून भारतीय रणगाडे शत्रूला मैदानातच धूळ चारू शकतील. चीन आणि पाकिस्तान या शत्रूराष्ट्रांमुळे भारताची भूमी धोक्यात आली असताना, हे क्षेपणास्त्र आजच्या घडीला भारताची मोठी गरज आहे. अंदाजे 500 कोटी डॉलरची 8 हजार क्षेपणास्त्रे इस्त्राईकडून भारताला मिळतील, अशी शक्यता आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या क्षेपणास्त्राबाबतचा करार यापूर्वी रद्द करण्यात आला होता, तो आता मार्गी लागेल. काही दिवसांपूर्वी लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले होते, की अशाप्रकारचे क्षेपणास्त्र डीआरडीओद्वारेही बनविले जात आहे. ही अत्यानंदाची बाब आहे. परंतु, हे क्षेपणास्त्र भारतात बनविण्यास चार वर्षे लागतील. त्यानंतर त्याच्या चाचण्यांनीही अपेक्षित परिणाम साधने गरजेचे असते. त्यामुळे इस्त्राईलची हीच तंत्रज्ञान असलेली क्षेपणास्त्रे भारताकडे आल्यास चार वर्षाच्या काळात आपण संरक्षण सिद्धतेत कमकुवत राहणार नाही. चीन आणि पाकिस्तानच्या कुरापती पाहाता, ही क्षेपणास्त्रे भारताच्या भात्यात येणे म्हणूनच गरजेचे आहे. क्षेपणास्त्रच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर लष्करी सहाय्य, लष्करी तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचा भारतात विकास या महत्वपूर्ण मुद्द्यांवरही इस्त्राईले भारताशी करार केले आहेत. या करारामुळे पाक आणि चीन या दोघांच्याही उरात धडकी भरणे अगदी सहाजिक आहे. इस्त्राईलच्या कंपन्या भारतात नजीकच्या काळात मोठी गुंतवणूक करण्यास तयार आहेत. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेलाही त्यांचा मोठा हातभार लागेल, शिवाय रोजगारनिर्मिती होऊन देशातील बेरोजगारांच्या हाताला काम देण्यात मोदी सरकार यशस्वी होईल. भारतीय शेती अलिकडे बेभरवशाची झाली आहे. त्याला कृषिक्षेत्रात आपण पाहिजे त्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करू शकलो नाहीत. त्या तुलनेत इस्त्राईलने कमी पाणी व जमिनीचा वापर करून शेती उत्पादनात क्रांती केली आहे. आता हे कृषितंत्रज्ञान भारताला देण्यासही इस्त्राईल तयार झाले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात कोरडवाहू शेतीतूनही चांगले अन्नधान्य पिकविता येईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही. इस्त्राईली नागरिक जेव्हा संकटात होते तेव्हा भारताने या देशाला भरभक्कम आधार दिला. त्यांचा सर्वाधिक विश्वास आजही आपल्यावरच आहे. वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आणि अमेरिकेनंतर वेगाने पुढे येणारी महासत्ता म्हणूनही हा चिमुकला देश भारताकडे आशाळभूतपणे पाहतो. भारताकडून या छोट्याशा मित्राला नक्कीच मोठ्या अपेक्षा आहेत. चारही बाजूने शत्रूंनी घेरलेल्या या देशाने लष्करी तंत्रज्ञानात जी कामगिरी केली ती अजोड आहे. हे लष्करी तंत्रज्ञान आपल्याला मिळाले तर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच शक्तीशाली राष्ट्र ठरू. त्यामुळे सहा दिवसांच्या दौर्यावर आलेल्या नेतन्याहू यांच्यामुळे भारत-इस्त्राईल मैत्रीचा आणि सहकार्यपर्वाचा आता नवीन अध्याय लिहिला जात आहे, याचा भारतीय म्हणून आपणास नक्कीच अभिमान असावा!