इंदूर । नवी दिल्लीच्या जोगिंदरने हरियाणाच्या प्रवेशला केवळ 20 मिनिटांमध्ये चितपट करून ‘सितारा दंगल’चे अजिंक्यपद पटकावले. या लढतीसाठी संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. इंदूरमधील या शानदार कुस्तीला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे मातीवरील कुस्तीवर अद्यापही प्रेम करणार्यांची वानवा नाही, हेच जणू सिद्ध केले.
स्थानिक नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या 5 मुख्य कुस्त्यांपैकी एक दिल्लीच्या नासिर हुसेन याने जम्मूच्या बिनीया अमीनला या मैदानातील सर्वाधिक रोमहर्षक झालेल्या लढतीमध्ये मात करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तर ‘भारत केसरी’ युधिष्ठिर आणि ‘मध्य प्रदेश केसरी’ रवी बारोड तसेच ‘कामगार महाराष्ट्र केसरी’ किरण भगत आणि ‘भारत केसरी’ प्रवीण भोला यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. या मैदानाचे औचित्य साधून एकेकाळचे ख्यातनाम मल्ल महाराष्ट्राचे काका पवार यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.