मुंबई । आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणारं शस्त्रसंधींचे उल्लंघन, अतिरेकी हल्ल्यात भारतीय जवान शहीद होणे यांसारख्या घटनांमुळे सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही प्रकारे क्रीडा सामने होत नाहीयेत. आंतराष्ट्रीय सामन्यांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे देश कोणत्याही क्रीडा प्रकारात आपला सहभाग टाळत आहेत. बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात झालेला करार बीसीसीआयने मोडल्यामुळे सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे दाद मागितली आहे. याचसोबत हॉकी इंडिया संघटनेनेही पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही प्रकारे सामने खेळणार नसल्याची भूमिका घेतली होती. मध्यंतरीच्या काळात पाकिस्तान हॉकी संघाच्या सहभागावरून हॉकी इंडियाने काही स्पर्धांमधून माघारी घेण्याचा मार्ग पत्करला होता, तर काही स्पर्धांमध्ये भारताच्या दबावामुळे पाकिस्तानला स्पर्धेत स्थान देण्यात आले नाही.
मात्र, आगामी काळात भारत आणि पाकिस्तान हे संघ हॉकी सामन्यात समोरासमोर उभे ठाकू ठकतात. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटेनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी भारत-पाक हॉकी सामन्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी भारत-पाक यांच्यात सामने व्हावेत या मताचा आहे. मात्र या दोन्ही संघटनांमध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि त्या कशा सोडवायच्या हे दोघांनाही एकत्र बसून ठरवावं लागेल. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटना दोन्ही संघटनांना मदत करायला तयार आहे. पुण्यात स्थानिक हॉकी सामन्यांच्या अंतिम फेरीसाठी हजेरी लावणार्या बत्रांनी भारत-पाक सामन्यांवर आपलं मत मांडलं आहे.