इंदापूर : संविधान बचाओ संघर्ष समीतीच्या वतीने 10 टक्के आर्थिक आधारावर आरक्षणाला विरोध, इ.व्ही.एम संबधीत निवडणूक आयोगाद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमाननेचा विरोध दर्शविण्यासाठी तसेच इतर विविध मागण्यांसाठी संविधान बचाओ संघर्ष समीतीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला इंदापुरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, किरकोळ विक्रेते, हातगाडीवाले व नागरिक यांनी दुकाने, व्यवसाय पूर्ण बंद ठेऊन पाठिंबा दिल्याने संविधान बचाओ संघर्ष समितीचा बंद इंदापुरात यशस्वी झाल्याची माहीती सुत्रांनी दिली. तत्सम उच्च जातींचे प्रशासनामध्ये अतिरिक्त प्रतिनिधीत्व, आरक्षण गरीबी निर्मुलनाचा मुद्दा नसून प्रतिनिधीत्त्वाचा मुद्दा आहे, आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी अद्यापपर्यंत का करण्यात आली नाही?, क्रिमिलेअर-ओबीसी आरक्षणासोबत धोका, खाजगीकरण-आरक्षणातील नोकर्या समाप्त, खाजगीकरणात आरक्षणाची आवश्यकता, 100 टक्के आरक्षण काळाची गरज अशा विविध मागण्यांसाठी संविधान संघर्ष बचाओ समितीने संपूर्ण भारत बंदचे देशव्यापी आंदोलन पुकारले होते. हा बंद शांततेत पार पडल्याची माहिती इंदापूर पोलीस निरिक्षक मधुकर पवार यांनी दिली. दहावी व बारावीच्या परीक्षा देण्यासाठी दुसर्या गावातून येणार्या विद्यार्थ्यांना इंदापुरात गैरसोय जाणवत होती. दुकाने उघडी नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.