शिरपूर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम.संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत २५ जानेवारी रोजी शहरातील पाताळेश्वर चौकातील शहीद वीर स्मारक येथे वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहरातून भारत माता व अनेक राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, घोडेस्वार, झाक्या, लेझीम नृत्य, स्काऊट-गाईड पथक, महाराष्ट्र व देशाच्या संस्कृतीचे सर्वांना दर्शन देऊन सवाद्य रॅली काढण्यात आली. या सर्व कार्यक्रमांनी उपस्थित मान्यवर तसेच शिरपूरकर मंत्रमुग्ध झाले. सर्वांनी देशभक्तीपर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुकही केले.
प्रजासत्ताक दिनी सर्वत्र कार्यक्रमांचे आयोजन असल्याने एक दिवस आधी शहरवासीयांना प्रेरणा मिळावी तसेच वीर जवानांचे स्मरण व्हावे म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो. शहरातील पाताळेश्वर चौकातील वीर स्मारक येथे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, काँगे्रस कमिटी तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, फिरोज काझी, कमलकिशोर भंडारी, नाटुसिंग गिरासे, यशवंत बाविस्कर, संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून शहीदांना मानवंदना देण्यात आली. वीर जवान तसेच असंख्य हुतात्मे यांचे स्मरण यावेळी करण्यात आले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देखील देण्यात आली.