ठाणे । मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करावी, 3 जानेवारीच्या बंददरम्यान ज्या आंबेडकरी तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते गुन्हे मागे घ्यावेत, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांच्यावरील रासुका हटवावा, या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने 26 फेब्रुवारी रोजी दिल्लीत मोर्चा नेण्याचे जाहीर केले आहे. या मोर्चाच्या अनुषंगाने ठाण्यात झालेल्या बैठकीमध्ये 500 जण दिल्लीतील मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रकाश डबरासे आणि ठाणे शहर अध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला ठाणे जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमध्ये मोर्चामागील भूमिका स्पष्ट करण्यात आली.
या मोर्चासाठी ठाणे शहरातील सुमारे 500 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. ठाण्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील कार्यकारीणी निश्चित करण्यात आली. या बैठकीत अशोक लाटे, तानाजी मोरे, सुमन मोरे, दत्तू सोनकांबळे आणि दीपक मोरे यांंना पक्षातून बडतर्फ करण्यात येत असल्याचे डबरासे यांनी जाहीर केले, तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्याचा मनोदय राजाभाऊ चव्हाण यांनी व्यक्त केला. तसेच 26 तारखेच्या मोर्चात सर्व आंबेडकरी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही चव्हाण यांनी केले आहे.