भारीप बहुजन महासंघाच्या मोर्चाने दणाणले फैजपूर

0

अतिक्रमित लाभार्थींना शासन योजनेपासून डावलले जात असल्याचा आरेाप

फैजपूर- प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या अतिक्रमित लाभार्थींना शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारीप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवार, 4 रोजी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघ यावल तालुका अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी केले.

हक्काच्या घरापासून लाभार्थी वंचित
फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात आले. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्र.1 (शासकीय अतिक्रमित) अडलेल्या गोरगरीब वर्गाला शासनाचा आदेश असतांना सुद्धा त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे. गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी आपणास 7 मार्च रोजी निवेदन सादर करण्यात आले मात्र त्यावेळी लोकशाही पध्दतीने आमची मागणी पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषणास बसणार होतो परंतु आदर्श आचारसंहिता असल्यामुळे 13 मार्चला पत्र दिले त्यात नमूद करून आचारसंहिता संपताच पालिका घटक क्र. 1 ची अंमलबजावणी करणार आहे, असे लेखी आश्वासन देण्यात आले मात्र आचारसंहिता संपल्यावरही संबंधित विषयाची दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने मंगळवारी मोर्चा काढण्यात आल्याचे नमूद आहे. त्यानंतरही पालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास येत्या 1 जुलैला पालिकेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला.

यांचा मोर्चात सहभाग
या मोर्चाला फैजपूर दिव्यांग सेनेतर्फे पाठींबा दिला. दिव्यांग सेनेचे यावल तालुकाध्यक्ष नाना मोची, दिव्यांग सेनेचे शहराध्यक्ष नितीन महाजन, सचिव मुन्ना चौधरी, गणेश भारंबे, संजय वानखेडे, ललित वाघुळदे यांच्यासह दिव्यांग बांधव व भारीप बहुजन महासंघ यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे सचिव दीपक मेघे, युवा तालुकाध्यक्ष सचिन बार्‍हे, माधव नरसो मोरे, कल्पनाबाई सावकारे, वच्छलाबाई श्रावण आढायंगे, पिंटू चावदस वाघूळदे, पवन चुडामन भील, मांगो बाबुराव भिल्ल, आकाश पोपट भिल्ल यांच्यासह अण्णाभाऊ साठे नगर व एकलव्य नगरातील महिला व युवा वर्ग तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी मोचकर्‍यांना मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी या विषयाची शक्य तितक्या लवकर दखल घेण्याचे आश्‍वासन दिल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबू नये असे लेखी आश्‍वासन दिल्याने मोर्चाची सांगता करण्यात आली.