भालोदचे शालेय पोषण आहार प्रकरण ; दोन दिवसानंतरही ‘खिचडी’ शिजेना

0

दोषींना वाचवण्यासाठी अधिकार्‍यांचा केविलवाणा प्रयत्न

फैजपूर- भालोद येथील आमदार हरीभाऊ जावळे अध्यक्ष असलेल्या शाळेमधील तांदूळ चोरी प्रकरण आता चांगलेच रंगू लागले असून त्याची आता सोशल मिडियावरही चर्चा होऊ लागली आहे. एरव्ही सर्वसामान्यांच्या बाबतीत तत्परता दाखवणारे पोलिस प्रशासन व पंचायत समिती, यावल विभाग तांदूळ चोरी प्रकरणात दोन दिवस उलटल्यानंतरही मूग गिळून बसल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. पंचायत समिती अधिकार्‍यांवर राजकीय दबाव तर येत नाही ना ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरी झाल्याच्या घटना झाल्या तर त्यात मुख्याध्यापकापासून तर संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याच्या घटना आहे मात्र भालोद येथील घटनेत चक्क मोटारसायकालवरून शालेय पोषण आहाराचा तांदूळ वाहून नेताना तरुण दिसत आहे तर दुसर्‍या घटनेत रीक्षामध्ये तांदुळाच्या गोण्या आढळल्या आहेत. त्यात एक महिलेने चक्क किती रुपयाचा किती किलो व कोणी तांदूळ दिल्याचे स्पष्टपणे सांगत आहे. या सर्व चित्रफिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. एव्हढे सर्व पुरावे असतांना संबंधित यंत्रणा मात्र गुन्हे दाखल करण्यासाठी एकमेकांकडे बोट दाखवून केवळी चौकशी सुरू असल्याचे सांगून धन्यता मानत आहे. पोलिस व पंचायत समितीतील शालेय पोषण आहाराचा विभाग सांभाळणारी यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे ? हेहीआता स्पष्ट होऊ लागले आहे. दहा मिनिटात शिजणार्‍या खिचडीला दोन दिवस झाल्यावरही उकळी फुटत नसल्याने चोरी प्रकरणातील तांदूळ संशयाच्या भवर्‍यात अडकला आहे.

कुणाच्याही ताबावाखाली काम करीत नाही -पोषण आहार अधिकारी गणेश शिवदे
भालोद येथील शालेय पोषण आहार चोरीची घटना ही निंदनीय आहे मुख्याध्यापक यांना नोटीस देऊन दोन दिवसात त्यांचे म्हणणे मांडायला सांगितले आहे त्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल. आमदार हरीभाऊ जावळे यांनी संबंधितांना निलंबनाचे आदेश दिले असल्याचे यावल पंचायत समितीचे पोषण आहार अधिकारी गणेश शिवदे म्हणाले.